फेरबदलाच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी! भाजपचे मात्र नाराजांवर लक्ष!

सध्या मंत्री असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून, हे सर्वजण आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत.

90

ठाकरे सरकारमध्ये येत्या काही दिवसात फेरबदल होणार असून, समाधानकारक कामगिरी नसलेल्या काँग्रेसमधील दोन नेत्यांना लवकरच डच्चू मिळण्याची शक्यता आहे. याचमुळे आता काँग्रेसमध्ये नाराजी पसरली असून, याच नाराजीचा फायदा घेण्यासाठी आता खुद्द देवेंद्र फडणवीस सज्ज झाले आहेत. काँग्रेसमधील घडामोडीवर आता भाजप लक्ष ठेवून आहे.

काँग्रेसच्या या नेत्यांचे मंत्रिपद जाण्याची भीती

कॉंग्रेसमध्ये पहिल्या टप्प्यात दोघांचे राजीनामे घेतले जाण्याचा अंदाज असून, यामध्ये के.सी. पाडवी, सुनील केदार, नितीन राऊत, तसेच विजय वडेट्टीवार यांच्या पैकी दोघांचे मंत्रिपद धोक्यात येऊ शकते. याचमुळे सध्या या सर्वांमध्ये नाराजी पसरली असून, हे सर्वजण आपले मंत्रिपद वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. यातील दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले, तर हे मंत्री नाराज होतील. त्याचमुळे सर्व घडामोडींवर भाजप लक्ष ठेवून संधीचा फायदा घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा : सरकारमध्ये मंत्री कमी बोलके पोपट जास्त! देवेंद्र फडणवीस यांची टीका)

केसी पडवींचे पक्ष नेतृत्वात आव्हान

राजीनामा हवा असेल तर तो ९ किंवा १५ ऑगस्टला घ्या, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनी पक्षनेतृत्वालाच आव्हान दिले आहे. पडवी यांनी स्वतःहून आपल्या राजीनाम्याचा मुद्दा काढून क्रांतिदिन किंवा स्वात्रंत्र्यदिनी मागण्याचे आव्हान पक्षाला दिले आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत.

वडेट्टीवार यांना बोलबच्चनगिरी भारी पडणार?

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांनी आजवर केलेली वक्तव्य भोवणार असल्याची माहिती मिळत असून, वडेट्टीवार यांच्यावर खुद्द मुख्यमंत्री नाराज आहेत. तसेच त्यांच्या कामगिरीवर हायकमांड देखील नाराज आहे. तर दुसरीकडे नितीन राऊत यांचे देखील मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.