उच्च न्यायालयाने राणेंना करून दिली संतवचनाची आठवण

114
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना संतांच्या वचनांची आठवण करून दिली.

न्यायालयाने काय म्हटले? 

नारायण राणे यांच्या याचिकेवर गुरुवारी, २१ एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही नेत्यांना घडलेल्या गोष्टी मागे सारून पुढे जायला हवे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या महाराष्ट्रात परिपक्व राजकारणाची परंपरा आहे. पूर्वीच्या राजकारण्यांची उदाहरणे पाहिली तर तेव्हाचे नेते, विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पूर्ण आदर करत त्यांच्याशी तसे वागायचे. त्यामुळेच या प्रकरणातही दोन वरिष्ठ नेत्यांनी तसेच वागणे अपेक्षित आहे, असे मत नोंदवले. ‘सल्ला देणे हे आमच्या अखत्यारित नसले तरी नारायण राणे हे स्वतः एका जबाबदार पदावर आहेत. त्यांनी दुसऱ्या एका जबाबदार आणि सन्मानाच्या पदावर असलेल्या मुख्यमंत्री यांच्याविषयी वापरलेले शब्द निश्चितच सन्मानजनक नाहीत, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.  झाले गेले विसरून जाऊ आणि एकमेकांशी सन्मानपूर्वक वागण्याचे ठरवू, असे नारायण राणे स्वतःहून निवेदन का करत नाहीत?’, असा सवाल करत नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ देऊ नका, असा सल्लाही राणे यांना न्यायालयाने दिला.

काय आहे नेमके प्रकरण?

भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांनी गेल्यावर्षी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. आपापल्या विभागात ही यात्रा काढावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नारायण राणे यांनी मुंबई आणि कोकणात अशी यात्रा काढली. यादरम्यान महाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे तीव्र पडसात सर्वत्र उमटले होते व शिवसैनिकांकडून अनेक पोलीस ठाण्यात राणे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. त्याआधारे राणे यांना अटकही करण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.