राणेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांचा राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी निदर्शने केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना प्रत्त्युत्तर द्यायला सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी राडा होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना लाठीचार्ज करुन जमावाला पांगवावे लागले.

शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांचा राडा

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानानंतर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आधीच संतापलेल्या शिवसैनिकांना भाजप कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. हिंमत असेल तर जुहू येथील राणेंच्या निवासस्थानी येऊन दाखवा, असे आव्हान भाजपकडून देण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली राणेंच्या निवासस्थानी निदर्शने करण्यास सुरुवात केली. शिवसैनिकांनी नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला.

पोलिसांनी केला लाठीचार्ज

शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर शिवसैनिकांना मागे जाण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिवसैनिक माघारी फिरले. त्यावेळी सुद्धा त्यांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणा देत, भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांची नासधूस केली.

दोन हात करायला का आले नाहीत?- सरदेसाई

गेले अनेक महिने भाजप आम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करत आहे. पण नारायण राणे यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हात उचलण्याची भाषा केली, तेव्हा शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणेंच्या बंगल्याखाली येण्याचे आव्हान भाजप कार्यकर्त्यांनी केल्यानंतरच प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरला. पण शिवसैनिकांना पाहून भाजप कार्यकर्ते घाबरले व त्यांनी आमच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. शिवसैनिकांनी प्रत्त्युत्तर केल्यानंतर त्यांनी पोलिसांचा वापर करत आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला. जर आव्हान दिले होते तर दोन हात करायला भाजप कार्यकर्ते का समोर आले नाहीत, असा संतप्त सवालही युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यांच्या निलंबनाची मागणीही सरदेसाई यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here