आधीच विविध मुद्द्यांवरुन विरोधकांच्या रडारवर असलेल्या ठाकरे सरकारची आता आणखी चिंता वाढली आहे. राज्य सरकारची चिंता वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. काल दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल २३ हजार १७९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून, आता कोरोनावर मात मिळवण्याचे प्रमुख आव्हान ठाकरे सरकार समोर आहे.
आधीच आर्थिक संकट त्यात कोरोना
सगळ्यात महत्वाचे मागील वर्षी राज्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्र थांबले होते. आता कुठे हळूहळू बिघडलेली आर्थिक गाडी रुळावर येत असताना, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन करणे राज्य सरकारला शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. याचमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यापेक्षा आणखी काही कठोर निर्णय करता येतील का, याचा विचार सध्या ठाकरे सरकार करत आहे. याचसाठी ठाकरे सरकारच्या सध्या मरेथॉन बैठका सुरू आहेत.
(हेही वाचाः मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात २,३७७ रुग्ण)
या जिल्ह्यांत कोरोनाचा वेगाने शिरकाव
राज्य सरकारसाठी सगळ्यात महत्त्वाची चिंतेची बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळ प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
पुणे बनेल पुन्हा हॉटस्पॉट
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुणे जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरू लागला असून, काल दिवभरात पुण्यामध्ये
४ हजार ७४५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला.
(हेही वाचाः कोविडचा संसर्ग थांबवण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही!)
कोणत्या जिल्ह्यांत किती रुग्ण?
मुंबई- २ हजार ३७७ नवीन रुग्ण, ८ जणांचा मृत्यू.
नाशिक- २ हजार १४६ नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू.
औरंगाबाद- १ हजार ३३५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर, ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.
नागपूर- ३ हजार ३७० नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात २ हजार ६६८ तर नागपूर ग्रामीणमधील ६९९ रुग्ण आहेत.
कल्याण-डोंबिवली- शहरात सर्वाधिक ५९३ रूग्ण आढळले आहेत. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने पालिकेने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र, नागरिक नियम पाळतानासुद्धा दिसत नाहीत.
टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार.
-राजेश टोपे, आरोग्यमंत्री
महाराष्ट्रातील मृत्यूदर जगात जास्त
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा २.२४ टक्के इतका आहे. तर भारतातील कोरोना मृत्यूदर हा १.३९ टक्के इतका आहे. मुख्य म्हणजे जगाचा कोरोना मृत्यूदर हा २.२१ टक्के असल्याने महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा जगाच्या तुलनेत देखील जास्त असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २१.१४ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हो ३१ ते ४० या वयोगटातील आहेत.