रस्ते सुरक्षेचे होणार ऑडीट: महापालिका प्रथमच नेमणार ऑडीटर!

रस्ते सुरक्षा परिक्षकाला प्रति किलोमीटरसाठी २० हजार रुपये मोजले जाणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांचे सुरक्षा परिक्षण करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने यासाठी रस्ते सुरक्षा परिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तीन वर्षांकरता शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे यासाठी स्वतंत्र रस्ते सुरक्षा परिक्षकाची निवड करण्यात येत असून यासाठी प्रति किलोमीटरसाठी २० हजार रुपये मोजले जाणार आहे. रस्ते सुरक्षा लेखापरिक्षा करण्यासाठी रस्ते सुरक्षा लेखापरिक्षकांची नेमणूक प्रथमच करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती

देशातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून उपचारात्मक कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिल्ली इंटिग्रेटेड मल्टीमोडल ट्रांन्झिट सिस्टीम लिमीटेड कंपनीची वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी नियुक्ती केली आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेमध्ये रस्ते सुरक्षा विषयक लेखापरिक्षण करण्यासाठी रस्ते सुरक्षा विषयक लेखापरिक्षकांची नेमणूक करण्यासाठी रस्ते व वाहतूक विभागाच्यावतीने निर्णय घेण्यात आला होता. सध्या अशा प्रकारच्या रस्ते सुरक्षा लेखापरिक्षा करण्यासाठी महापालिकेकडे रस्ते सुरक्षा लेखा परिक्षक उपलब्ध नाहीत. अशा प्रकारच्या रस्ते सुरक्षा लेखापरिक्षा करण्यासाठी रस्ते सुरक्षा लेखापरिक्षकांची नेमणूक प्रथमच करण्यात येत आहे. रस्ते सुरक्षा परिक्षकांना विद्यमान व नवीन प्रस्तावित रस्त्यांची तपासणी करून त्यांच्या सुरक्षेचा विस्तृत अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

(हेही वाचा : दादर रेल्वे स्थानकाकडील हनुमान मंदिर बेकायदेशीर! रेल्वेचा ७ दिवसांचा अल्टिमेटम!)

रस्त्यांचे सुरक्षा मुल्यांकन दुर्लक्षित!

वाढत्या शहरीकरणांमुळे आणि वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीचे पर्याय बदलले गेले व लोक स्वत:च्या वाहनांमधून प्रवास करू लागले. पण शहरामधील रस्त्यांचे सुरक्षा मुल्यांकन जवळजवळ दुर्लक्षितच झाले आहे. त्यामुळे या रस्ते सुरक्षा लेखापरिक्षकांची नेमणूक करून अपघात रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करता येईल व असुरक्षित रस्ता वापरणाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. त्यामुळे रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी रस्ते सुरक्षा लेखापरिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here