कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला पीपीई किट न घालता किंवा कोविड प्रोटोकॉल न पाळता रोहित पवारांनी भेट दिली आणि तिथे चक्क डान्स केला. कोविड सेंटरमधील गंभीर वातावरण बदलण्यासाठी असे केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. पण यामुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला असून, “शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी झाले झिंगाट
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट देत, कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो, असं रोहित पवार यांनी डान्सचा व्हिडिओ ट्वीट करत म्हटले आहे. पण यावरुन ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.
गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. pic.twitter.com/EuniVa8FU6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2021
(हेही वाचाः कोरोना पॉझिटिव्ह असाल तर आता तुमची रवानगी होणार… जाणून घ्या कुठे ते?)
रोहित पवार यांना पाठीशी घातलं जातयं का?
या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, “रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी कोरोना नियमांचं गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे.” आता या वादानंतर सरकार रोहित पवारांविरुद्ध कारवाई करणार का? किंवा ही घटनासुद्धा काळाच्या पडद्याआड जाण्याची वाट पाहणार, हे काही दिवसात कळेलच, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community