राज्याचे राजकारण हे गेली अनेक वर्षे पवार या आडनावाभोवती फिरताना आपण पाहत आलो आहोतच. शरद पवार यांच्या मनात कधी काय चालेल याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येत नाही. राज्यात जे कधी शक्य नव्हते अशी महाविकास आघाडी देखील पवारांनी करुन दाखवली. सध्या राज्याच्या राजकारणात देखील वातावरण तापले आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन सध्या दिल्लीत जोर बैठका सुरू असताना, शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज चक्क विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. प्रविण दरेकर आणि रोहित पवार यांची आज सकाळीच दरेकर यांचे सरकारी निवासस्थान अवंती येथे भेट झाली आहे. रोहित पवार आज सकाळीच दरेकर यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली.
भेटीचे कारण गुलदस्त्यात
रोहित पवार यांनी नेमकी भेट का घेतली याचे कारण अद्याप कळू शकले नसले, तरी या भेटीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही कळलेल नाही. राज्यातील सरकारमध्ये असलेल्या नेत्यांच्या भेटी-गाठी जोरदार चालू असताना, आता रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचाः संजय निरुपम यांचे शिवसेनेवर शरसंधान… म्हणाले ही सत्ता प्रायोजित हप्ता वसुली!)
रोहित पवार यांच्या विषयी थोडक्यात
रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत. वडिलांसोबत सुरुवातीला व्यवसायात उतरलेल्या रोहित यांनी पुढे आजोबा आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. रोहित पवार सध्या बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव देखील केला आहे.
Join Our WhatsApp Community