Rohit Pawar : शरद पवार गटात वाढतेय रोहित पवारांचे वजन; वरिष्ठांमध्ये नाराजी

146
Sunetra Pawar Nomination : रोहित पवारांची नेटकऱ्यांनी ‘X’वर अक्षरशः काढली...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सध्या रोहित पवारांची वाढती सक्रियता वरिष्ठांना खुपत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर रोहित पवार यांनी ती जागा व्यापण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. याचं उदाहरण द्यायचं झालं तर राज्यात ठिकठिकाणी शरद पवार यांच्या सभेपूर्वी “घेऊन येतोय साहेबांचा संदेश” ही मोहीम, थेट अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीकेचा वार आणि त्यानंतर आता युवा संघर्ष यात्रा असल्याचं बोललं जात आहे. रोहित पवार यांच्या याच सुसाट गाडीला ब्रेक लावण्यासाठी नंबर दोनचे नेते सरसावल्याचं समोर आलं आहे. याचं उदाहरण म्हणजे रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेकडे नंबर दोनच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ हे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा सुरू करण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वासात घेतलं नाही. यात्रा सुरू करण्यापूर्वी थेट नियोजनाची फाईल जयंत पाटील यांच्या हातात देऊन यात्रा सुरू करत असल्याची माहिती दिली. याचाच राग जयंत पाटील यांना आल्याने पक्षातील जयंत पाटील यांना मानणाऱ्या वर्गाने थेट रोहित पवार यांच्या यात्रेत सहभागी न होण्याची भूमिका घेतली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांचे निकटवर्तीय सध्या यात्रेत सहभागी झालेले नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर जयंत पाटील यांच्या कायम अवती भवती फिरणारे युवकचे प्रदेशाध्यक्ष यांचं देता येईल. युवा वर्गाची यात्रा म्हणजे किमान पक्षाच्या युवकच्या प्रदेशाध्यक्षाने उपस्थित राहणं अपेक्षित होतं. मात्र त्याने कोणत्याही परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी नको म्हणून यात्रेपासून चार हात लांब राहणं पसंत केल्याचं पहायला मिळत आहे.

(हेही वाचा Urban Naxal : राजकीय पक्षांमध्‍ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी अराजकतेची चाहूल)

तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या सोबत राहणाऱ्या एका कार्यकर्त्याला यात्रेत मी सहभागी होऊ नये अन्यथा पदावरून दूर करण्याची धमकी थेट प्रदेशाध्यक्षांनी दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सदर कार्यकर्त्याने पक्षातील वरिष्ठ महिला खासदार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या धमकीची तक्रार केली असता सदर कार्यकर्त्याची खासदारांकडूनच कानउघाडणी करताना प्रदेशाध्यक्ष आणि माझ्यात वाद लावू नका स्पष्ट शब्दात झाल्याची माहिती समोर आली आहे.” एकंदरीतच महिला खासदार आणि प्रदेशाध्यक्ष यांना रोहित पवार यांची सुपरफास्ट वेगाने सुरू असलेली घोडदौड रुचत नसल्याचं अधोरेखित झालं आहे. याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे रोहित पवार यांचा अपूर्ण राहिलेला युवा संघर्ष यात्रेचा दौरा आता चौंडी येथून सुरू झाला खरा, परंतु याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डेंग्यूचं कारण पुढे करत दांडी मारल्याचं पहायला मिळालं.

शरद पवार यांना देखील इतिहासाच्या पुनरावृत्तीची भीती?

अजित पवार यांनी दुसरा गट स्थापन केल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडून ताक देखील फुंकून पिण्याचं सुरू असल्याची माहिती आहे. एका मोठ्या नेत्याशी बोलताना शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यात्रेत सहभागी झाले तर जा अन्यथा जाऊ नका असं सांगितल्याचं समजतंय. कारण पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती नको असं त्यांचं म्हणणं असल्याचं वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे. मूळात असं शरद पवार का म्हणाले असतील याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता रोहित पवार यांनी २०१९ सालीच विधानसभा तिकीटासाठी हडपसरमध्ये भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत बोलणी करून भाजप प्रवेशाची तयारी दर्शवल्याची माहिती सर्वश्रुत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटामध्ये देखील एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करण्याचे राजकारण लवकरच समोर दिसू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.