Republic day 2023: बंधूभावाच्या बळावर नांदते स्वातंत्र आणि समता, डॉ. मोहन भागवतांचं प्रतिपादन

99

प्रजासत्ताकाच्या यशस्वीतेसाठी स्वातंत्र्य आणि समतेसोबतच बंधूभाव असणे क्रमप्राप्त ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील हेच अभिप्रेत होते. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समतेचा लाभ घेण्यासाठी समाजात बंधूभाव निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजस्थानच्या जयपूर येथील जामडोलीच्या केशव विद्यापीठ समितीतर्फे आयोजित प्रजासत्ताक दिन समारंभात ते बोलत होते.

‘भारत हा ज्ञानी आणि निस्वार्थी लोकांचा देश बनवायचा’

याप्रसंगी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक म्हणाले की, ‘आपला राष्ट्रध्वज हा सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्याच्या तिन्ही रंग देशाला गंतव्याकडे मार्गक्रमणाची दिशा दाखवतात. तसेच हे रंग आपल्याला त्यांच्या विशेष गुणांसह संदेश आणि प्रेरणा देतात. राष्ट्रध्वजाचा भगवा रंग ज्ञान, त्याग आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. आपल्याला भारत हा ज्ञानी आणि निस्वार्थी लोकांचा देश बनवायचा आहे. केवळ भारताचेच नाही तर आपल्या ज्ञानाने, त्याग आणि परिश्रमाने देशासह जगाचे कल्याण करायचे आहे. त्याचप्रमाणे तिरंग्याचा पांढरा रंग आपल्याला आंतरिक शुद्धता शिकवतो. या रंगापासून प्रेरणा घेऊन आपण स्वतःमध्ये आणि समाजात आंतर्बाह्य शुद्धतेचे बिजोरोपण करू शकतो. पांढरा रंग शुद्धता आणि आपलेपणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. हिरव्या रंगाचे वैशिष्ट्य सांगताना डॉ.भागवत म्हणाले की, तिरंग्याचा हिरवा रंग समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. व्यक्ती, समाज आणि देशाच्या उत्कर्षाची प्रेरणा आणि ज्ञान या रंगातून मिळते. यासोबतच हिरवा रंग आपल्या पर्यावरणाचेही प्रतीक आहे. हा रंग पर्यावरणाशी एकरूप होऊन प्रगतीचा संदेश देतो असे’, त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा)

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या भाषणाचे स्मरण करून डॉ.भागवत म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर म्हणायचे की आपला देश कोणा शत्रूमुळे नाही तर आपसातील भांडणामुळे गुलाम बनला होता. डॉ. आंबेडकरांनी सामाजिक विषमतेची गुलामगिरी दूर करण्यासाठी राज्यघटनेत राजकीय आणि आर्थिक समानतेची तरतूद केली आहे. इतरांना गुलाम करून आपल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मानता येत नाही’, असे सरसंघचालकांनी सांगितले.

‘जगाचा अनुभव असा आहे की, जिथे स्वातंत्र्य आणायची असते तिथे समानतेचा संकोच करावा लागतो. जिथे समानता आणायची असते तिथे स्वातंत्र्य दिसत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता हवी असेल तर बंधुभाव असणे अत्यंत आवश्यक आहे. याचाच विचार करून डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य आणि समतेसोबत बंधुता या शब्दाचाही आपल्या संविधानात समावेश केला होता,’ असे भागवत यांनी सांगितले. ‘हा बंधुभाव देशभर पसरला पाहिजे. जेव्हा आपला विविधतेने नटलेला समाज बंधुभावाने एकत्र येतो, तेव्हाच स्वातंत्र्य आणि समतेची प्राप्ती होते. केवळ सामाजिक बंधूभावच स्वातंत्र्य आणि समतेची हमी देतो. ही हमी इतर कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे पुढील प्रजासत्ताक दिनापर्यंत आपण स्वतःमध्ये बंधुभाव जोपासला पाहिजे आणि समता व स्वातंत्र्याची नांदी करून देशाला पुढे न्यावे’, असे आवाहन यावेळी सरसंघचालकांनी केले.

(हेही वाचा – सरकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगूर येथे सावरकर वाड्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.