अखिल विश्वातील हिंदूंची मातृसंघटना म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात पुढाकार घेतला आहे. तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावेत, यासाठी आता भारताने थेट बांगलादेशाला दमात घ्यावे, असा ठराव संघाच्या बैठकीत संमत झाला.
काय भूमिका आहे संघाची?
नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात बांगलादेशात हिंदूंवर खोटेनाटे आरोप लावून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. हे सर्व हल्ले सुनियोजित पद्धतीने करण्यात येत होते, अशा रीतीने येथे हिंदू असुरक्षित बनले आहेत. त्यामुळे हिंदूंवरील हल्लेखोरांविरोधात बांगलादेशी सरकारने कठोर कारवाई करावी आणि हे हल्ले थांबवावेत. बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाला नष्ट करण्याचा हा तेथील धर्माधांचा कुटील डाव आहे. हा चिंतेचा विषय असून केंद्र सरकारने द्विपक्षीय चर्चेच्या सर्व मार्गाचा अवलंब करावा, असा प्रस्ताव संघाच्या बैठकीत चर्चिला गेल्याची माहिती संघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत असताना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
(हेही वाचा : आली लगीनघाई, कोरोनाला निमंत्रण देई…)
तीन दिवसीय बैठकीचे आयोजन
धारवाड येथे संघाची ‘अखिल भारतीय कार्यकारी मंडळा’ची तीनदिवसीय बैठक गुरुवारी सुरू झाली. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सर्व सहकार्यवाह तसेच, प्रांतसंघचालक, कार्यवाह प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, संघपरिवारातील संघटनांचे सचिव असे एकूण साडेतीनशे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित आहेत. २०२५ मध्ये संघाच्या शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त तीन वर्षांचा विस्तार कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्याचाही सविस्तर आराखडा या बैठकीत निश्चित केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community