RSSचे राज ठाकरे यांनी केले कौतुक; म्हणाले, एखाद्या संघटनेने १०० वर्षे…

197
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) ९९ वर्षे पूर्ण झाली असून १०० वे वर्ष सुरु झाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आजपासून सुरु होत आहे. यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी RSS चे कौतुक केले. एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावे हे सोपे नाही. जगाच्या इतिहासात एखादी संघटना १०० वर्षे टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल, असे वाटत नाही. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. तसेच हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे राज ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठे काम केले आहे. संघाचे काम मला कायमच अचंबित करते. देशात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिले आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणे, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणे, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.