मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. आजही माझे आदर्श शरद पवारच आहेत, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अजित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद दिलं. यानंतर त्या आज पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला सुरक्षा आणि झालेल्या कारवाई संदर्भात आढावा घेतला. तसेच काही सूचनाही केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच कोल्हापुरात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना मी यापूर्वी अनेकदा येथे येऊन गेले. मात्र महिला आयोगाची अध्यक्ष आणि पक्षाची महिला अध्यक्ष असताना मी येथे पहिल्यांदाच आले आहे. २०१९ ला पक्षाची महिला अध्यक्ष असताना अडीच वर्ष हा पदभार मोठ्या ताकतीने सांभाळला. मोठ्या संख्येने महिला गोळा केल्या. मात्र कालांतराने काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आता अजित पवारांनी पुन्हा महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. पूर्वीच्या कामाचा अनुभव आणि आयोगाचा अनुभव चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल आणि यामुळे २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रावादीच्या मतदानाचा टक्का वाढलेला असेल आणि तोही राष्ट्रवादीच्या महिला संघटनेमुळे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच दादा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल. आणि कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरच असेल, असेही त्या म्हणाल्या.
(हेही वाचा Khalistani : खलिस्तानच्या नावाखाली कॅनडात भारतीय अधिकाऱ्यांविरुद्ध कट; भारतीय वंशाच्या खासदाराने फटकारले)
‘माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का लावला गेला?’
तसेच आजही शरद पवार माझे दैवत आहेत. संघटनेमध्ये काम करत असताना मी अनेक पद भूषवले. मी महिला अध्यक्ष असतानाही त्यांनी मला महिला आयोगाची अध्यक्ष केलं. यामुळे पक्षाची ताकत वाढेल. मात्र महिला आयोगाची अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, असं म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. घरावर तुळशीपत्र ठेवून वाड्यावर जाऊन लोकांमध्ये जाऊन मी संघटना वाढवली आणि त्यांनी माझा राजीनामा घेतला, असे चाकणकर म्हणाल्या.
संघटना ही मला घरासारखी आहे. यापूर्वीचे सर्व अध्यक्ष दोन दोन पदावर काम करत होते. मग मला असा वेगळा का नियम लावला गेला? असा सवालही त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे. गेल्या पंधरा महिन्यात मला पक्षाच्या एकाही कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नाही. कुठल्याही व्यासपीठावर मला जाता आले नाही. तर गेल्या दीड वर्षात माझं काय चुकलं? हे देखील पक्षातील वरिष्ठ महिला नेत्यांनी मला बोलावून सांगितल नाही, असे म्हणत नाव न घेता त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.
Join Our WhatsApp Community