मागील ५१ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. बलाढ्य रशियाला छोटासा युक्रेन अजून जिंकता येत नाही, यामागील कारण रशियाला आता उमगले आहे. युक्रेनला नाटो आणि अमेरिका शस्त्र पुरवत आहे. त्यामुळे रशिया युक्रेनसोबत नव्हे तर नाटो आणि अमेरिकेसोबत लढत आहे, हे सरळ सरळ तिसरे महायुद्ध आहे, अशी घोषणा रशियाच्या अधिकृत सरकारी टीव्ही चॅनलने केली आहे.
रशियाला संताप अनावर
शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी ब्लॅक सीमध्ये रशियाच्या मोस्कवा या युद्धनौकेवर युक्रेनने क्षेपणास्त्र डागल्यानंतर ही युद्धनौका समुद्रात बुडाली. यामुळे रशियाचा संताप अनावर झाला आहे. रशियाच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ओडेसा किनाऱ्याजवळ दोन वेळा या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दाव्यानंतर रशियाच्या ‘ रशिया १’ या सरकारी टीव्ही चॅनेलवरून तिसऱ्या महायुद्धाची घोषणा करण्यात आली आहे. या युद्धात केवळ युक्रेनच त्यांची शस्त्रे वापरत नाही तर नाटो आणि अमेरिकाही शस्त्रे पुरवत आहे, त्यामुळे रशियाला एकाच वेळी नाटो आणि अमेरिका यांच्याशी लढावे लागत आहे. म्हणून हे तिसरे महायुद्धच आहे. दुसरीकडे युद्धनौका गमावल्याने भडकलेल्या रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनची राजधानी कीव्ह शहरावर चौफेर क्षेपणास्त्र हल्ला सुरू करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे.
(हेही वाचा इन्फोसिस कंपनीला ८० हजार कामगारांचा रामराम)
Join Our WhatsApp Community