अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण निर्माण झालेली आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी असून महापालिका सेवा नियमावलीनुसार त्यांचा राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज हा अर्ज केल्यापासूनच्या तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो. मात्र, लटके यांनी आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा महिन्यापूर्वीच दिलेला असून तो अर्ज जोवर मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची टिम महापालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या पायऱ्या झिजवताना दिसत आहे. त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास उद्धव गटापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – छगन भुजबळांनी ‘मशाल’ चिन्हावर पहिली निवडणूक लढवली होती, पण…)
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत स्वर्गीय शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा अर्ज प्रशासनाला सादर केला. ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत असून हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अखत्यारित येत असल्याने एक महिन्यापूर्वी सादर केलेल्या या अर्जावर तातडीने निर्णय घेत तो मंजूर करावा यासाठी माजी मंत्री, शिवसेना प्रवक्ते आणि विभागप्रमुख अनिल परब यांनी सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक मनोहर पांचाळ, सुभाष कांता सावंत, प्रमोद सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
परब यांनी यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत यांचीही भेट घेऊन याबाबतची कार्यवाही त्वरेने करण्याची सूचना केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांना तातडीने याबाबतची कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार किमान सेवेची २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो, परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहीत धरून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कर्मचारी अर्ज करू शकतो. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा सेवा कालावधी तपासून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्याची पुढील कार्यवाही केली जाईल,असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले जात आहे.
Join Our WhatsApp Community