‘मोदी है तो मुमकीन है’, असे शिवसेना का म्हणाली?

जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

74

मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी २०२४ च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ‘‘मोदी है तो मुमकीन है’’ म्हणायचे ते इथे!, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

नड्डा यांची वाहवा!

जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व नड्डांनी घरी बसवले आहे. ज्या २४ मंत्र्यांनी शपथ घेतली ते सर्व प्रथमच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी व नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे. राजेंद्र त्रिवेदी हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनाही पायउतार केले व मंत्री केले. रूपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते, पण रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळास घरचा रस्ता दाखवून मोदी-नड्डा जोडीने एक जोरदार राजकीय संदेश स्वपक्षास दिला आहे. मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे स्वतःला ‘हेवीवेट’ समजत होते. रूपाणी यांना मुख्यमंत्री केले तेव्हाही नितीन पटेल हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते व आता रूपाणी यांना बाजूला केले तेव्हाही तेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. एकतर ते गुजरातमधील पाटीदार समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत व पाटीदार समाजात त्यांचे वजन आहे. पाटीदार समाजाचे आंदोलन गुजरातमध्ये झाले तेव्हापासून हा समाज अस्वस्थ आहे, असेही शिवसेनेने म्हटले.

(हेही वाचा : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणारच नाही!)

गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम  

उद्याच्या विधानसभा निवडणुकीत या असंतोषाचा फटका बसेल व गुजरातमध्ये भाजपची फजिती होईल याचा अंदाज आल्यानेच आधी रूपाणी यांना त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह घरी पाठवले, पण नेतृत्वाची घडीच पूर्ण बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १४ मंत्री पाटीदार व ओबीसी समाजाचे आहेत. हे धाडसाचे काम असले तरी स्वपक्षात अशी धाडसी पावले मोदीच टाकू शकतात. मोदी आता सत्तर वर्षांचे झाले. त्यामुळे त्यांची पावले अधिक दमदार पद्धतीने पडत आहेत आणि वाटेतले काटेकुटे ते स्वतःच दूर करीत आहेत. मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच त्यांनी पक्षातील अनेक जुन्या-जाणत्यांना दूर करून मार्गदर्शक मंडळात नेमले. म्हणजे हे मार्गदर्शक मंडळ कामापुरते नसून उपकारापुरतेच ठेवले. आडवाणी, मुरली मनोहर जोशी हेसुद्धा त्याच मार्गदर्शक मंडळात बसून आहेत. कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेररचनेत अनेक जुन्यांना मोदी यांनी घरचा रस्ता दाखवून नव्यांना स्थान दिले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची वेळ आली. मोदी यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व त्या कामी सूत्रे स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले आहे. देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे. लोकांत तसेच विरोधकांत मोदींच्या कार्यपद्धतीविषयी जो रोष दिसतोय त्यास स्वतः मोदी किती जबाबदार व त्यांच्या अवतीभवतीचे किती कारणीभूत हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली व त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.