निवडणुका नसल्याने सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळ बंद!

भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असा इशारा शिवसेनेने दिला.

एकाच वेळी पाच जवानांना कंठस्नान घातले जाते. निरपराध हिंदू पंडितांना, कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांना मारले जाते. त्याचा बदला घेतला नाही तर आपल्या भूमीवर सांडलेले रक्त आणि अश्रू वायाच गेले असे होऊ नये. इतर देशांत असे घडले असते तर त्या देशाने सैनिकांच्या हत्येचा बदला लगेच घेतला असता. आता निवडणुकांचा मोसम नसल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे साहसी खेळही खेळता येत नाहीत, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटले आहे.

…तर देशाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल

सध्या काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवाया आणि चीनच्या सीमेवर चिनी सैनिकांची होत असलेली घुसखोरी या दोन मुद्यांच्या आधारे सामानातून केंद्राचा समाचार घेण्यात आला आहे. भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. भारताने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आपल्या अस्तित्वालाच आव्हान देतील, असा इशारा दिला.

(हेही वाचा : राज्य सरकारची आता काळी पत्रिका निघणार!)

चीन चर्चा करते, कृती मात्र मनाप्रमाणे करते!

जे कश्मीरात तेच चीनच्या सीमेवर. पूर्व लडाखमध्ये घुसविलेले सैन्य माघारी घ्यायला चीन तयार नाही. दोन देशांतील चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत, पण तोडगा निघायला तयार नाही. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने तळ ठोकून आहे. उत्तराखंडमधील बाराहोती क्षेत्रात, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. यांगत्झे भागात दोन देशांचे जवान मागच्याच आठवडय़ात समोरासमोर आले व गलवान व्हॅलीप्रमाणे रक्तपाताची पुनरावृत्ती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. हे प्रकार वाढले आहेत व चीन कोणताही करार पाळायला तयार नाही. चीनचे अधिकारी चर्चेला बसतात, चर्चा लांबवतात, पण शेवटी त्यांना हवे तेच करतात, असेच शिवसेनेनं म्हटले.

चीनने भारताच्या जमिनीवर पाय रोवण्यास सुरुवात केली

कोणत्याही रचनात्मक सुधारणा मान्य करायला चीन तयार नाही. पूर्व लडाखवर चीन त्याचा हक्क सांगतो व चीनने मुजोरपणाने एकतर्फी घुसखोरी केली आहे. चीन हा एक नंबरचा साम्राज्यवादी आहे. साम्राज्यवादी असायला हरकत नाही, पण सभ्यता, सुसंस्कृतपणाशी चीनचा उभा दावा असल्याने त्याच्या साम्राज्यवादी विचारांना गल्ली गुंडगिरीचा माज आहे. चीन त्याच्या विस्तारासाठी शेजारच्या राष्ट्रांतील दहशतवादास पाठिंबा देतो. चीन अमली पदार्थांच्या व्यापारास पाठिंबा देतो. चीन शेजारी राष्ट्रांतील अंतर्गत झगड्यात नाक खुपसून माओवाद विस्तारायच्या नावाखाली शस्त्रास्त्र व अर्थपुरवठा करतो. चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here