वरुण गांधींप्रमाणे जे व्यक्त होऊ शकले नाहीत, त्यांच्याकरता ‘महाराष्ट्र बंद’!

91

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्लावर वरुण गांधी हे धाडसाने बोलले. इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र ‘दैनिक सामना’च्या संपादकीय लेखातून भाजपा नेते वरुण गांधी यांचे कौतुक करण्यात आले.

…म्हणून वरुण, मनेका गांधींना भाजपाकडून शिक्षा 

लखीमपूर येथील शेतकरी हल्ल्यानंतर भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी या हल्ल्याच्या विरोधात तिखट प्रतिक्रया दिली, त्यानंतर शिवसेनेने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर याच वरुण गांधींच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. तेव्हा गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली. लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे. तसे असेल तर ते गंभीर आहे. हिंदू आणि शीख एकच आहेत. त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न आता परवडणारा नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

वरुण गांधींच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी करावा! 

वरुण गांधी हेसुद्धा इंदिरा गांधींचे नातू व संजय गांधींचे पुत्र आहेत. लखीमपूर खेरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त तापले व त्यांनी मत व्यक्त केले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे काय? शेतकऱ्यांच्या हत्या, त्यांच्या रक्ताचे पाट पाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल. वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले? वरुण गांधी हे धाडसाने बोलले,  सेनेने म्हटले.

देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बंद! 

इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील. लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळय़ांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभे आहे. बांधावर जाऊन शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा, पण चार शेतकऱ्यांना भाजपच्याच मंत्रिपुत्राने चिरडून मारले त्या कृत्याचा साधा निषेधही करायचा नाही, अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची तऱ्हा आहे. सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.