शिवसेना म्हणतेय ‘राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला!’

राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे. राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करीत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी रोखायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

144

सरकारने विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची शिफारस करुन आता आठवा महिना लागला आहे. राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कधी हलणार हे राजभवनातील सुईणीने स्पष्ट करावे, अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.

राज्यपाल चेष्टेचा विषय!

‘राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला!’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यात राज्यपालांसह भाजपवर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यपालांनी ८०व्या वर्षी पायी सिंहगड सर केला याचे कौतुक कुणाला नाही? पण लोकशाही व घटनेचा किल्ला ते पाडू पाहत आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे. पदाचे इतके अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करून ठेवली आहे. राजभवनातील घडामोडींचे आता जनतेला व सरकारलाही काही वाटेनासे झाले आहे. राज्यपालांच्या अधःपतनास जितके ते स्वतः जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त राज्यातील त्यांचा पितृपक्ष भाजप जबाबदार आहे, अशी टीका करण्यात आली आहे. राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे. राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करीत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी घटनेची, लोकशाहीची ही घसरगुंडी रोखायला हवी. राजभवनांचा वापर करून सत्तापरिवर्तन वगैरे होत नाही व अफगाणिस्तानच्या अब्दुल घनी यांच्याप्रमाणे कोणी सरेंडर ही होत नाही, हे प. बंगाल व महाराष्ट्रात दिसून आले. येथे जातीचेच आहेत हे येरागबाळ्यांनी समजून घ्यावे, अशी टीकाही भाजपवर करण्यात आली.

(हेही वाचा : हुश्श! तालिबान्यांशी लढायला कुणीतरी आला…कोण आहे ‘तो’?)

भाजपवर टीका!

१२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवून भाजप व राज्यपाल स्वतःचेच हसे करून घेत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे व वैफल्याचे झटके आहेत. जनतेच्या मनातून त्यांचे स्थान घसरले आहेच. पण आता हायकोर्ट व शरद पवारांसारखे मोठे नेतेही खुलेआम टपल्या आणि थपडा मारू लागले आहेत. भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचे कारण नाही, पण राज्यपाल म्हणून त्यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे, असेही यात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.