दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र् आता काढावीच लागतील, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयातून देण्यात आला आहे.
राज्यावर लोड शेडींगचे संकट केंद्राचे षडयंत्र!
महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे. महाराष्ट्रावर ‘लोड शेडिंग’ म्हणजे अंधाराचे संकट कोसळताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे ‘व्यापारी’ सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही सेनेने म्हटले आहे.
(हेही वाचा : अखेर आव्हाडांना अटक झालीच! काय म्हणाले करमुसे?)
भाजपाचा बुरखा फाटला!
एकजुटीची वज्रमूठ हीच लढणाऱयांची ताकद आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने हीच एकजुटीची ताकद दाखवली आहे! महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत. एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही, असेही सेनेने म्हटले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका
शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. महाराष्ट्र हा अमृताचा कुंभ आहे. विचारांची खाण आहे. शौर्याचे तेज आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र याच संपत्तीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे मन शुद्ध आहे. आजच्या विजयादशमीला त्याच शुद्ध विचारांची सुवर्णपाने वाटूया आणि लुटूया!, असेही सेनेने म्हटले आहे.
(हेही वाचा : सेना भवनासमोरच मनसे म्हणते ‘गर्व से कहो हम हिंदू है!’)
Join Our WhatsApp Community