सचिन अहिर शिवसेनेत लक्ष मात्र राष्ट्रवादीत!

सचिन अहिर यांना शिवसेनेत स्वत:च्या समर्थकांचा मोठा गट बनवायचा असेल अथवा भविष्यात पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची वेळ आलीच, तर समर्थक कायम असावेत, यासाठी त्यांचा खटाटोप सुरु  आहे, असे बोलले जात आहे.  

82

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी आजही त्यांचे लक्ष जुन्या सहकाऱ्यांकडेच आहे. शिवसेनेत प्रवेश करूनही सचिन अहिर यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुन्या सहकारी आणि समर्थकांकडेच लक्ष असून शिवसेनेच्या मदतीने त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मालाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका धनश्री भराडकर यांच्या प्रयत्नातून सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या लोकार्पणाची माहिती खुद्द सचिन अहिर यांनी आपल्या टि्वटरवरून दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेतेच होते गायब! 

मालाडमधील कुरार व्हिलेजसह प्रभाग ४४च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका धनश्री भराडकर यांच्या प्रयत्नाने मालाड कुरार व्हिलेज येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका असून त्याच्या स्व पक्षातील मोठ्या पदाधिकाऱ्याने हजेरी लावली नाही. तर शिवसेना नेते आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यामध्ये सहभागी घेत याचे उद्घाटन केले. याप्रसंगी खासदार गजानन किर्तीकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू,माजी मंत्री सचिन अहिर, नगरसेविका धनश्री भराडकर, वैभव भराडकर, जिल्हाध्यक्ष अजित रावराणे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा : धक्कादायक! रोहयो मंत्र्याच्या गावातच रोजगार हमीचे बोगस कामगार!)

भरडकर सचिन अहिरांचे समर्थक! 

विशेष म्हणजे सचिन अहिर यांनी याची माहिती ट्विटरद्वारे दिली. सचिन अहिर यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते याचे उद्घाटन झाल्याचे व आपणासह खासदार, आमदार आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मुंबई महापालिका गटनेत्या राखी जाधव उपस्थित असल्याची माहिती दिली. सचिन अहिर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राखी जाधव, अजित रावराणे हे कट्टर समर्थक मानले जात असून आता वैभव भरडकरही सचिन भाऊंचे समर्थक मानले जात आहेत. परंतु वैभव भराडकर आणि आमदार सुनील प्रभू यांचे राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे अहिर यांच्यामुळेच सुनील प्रभू यांना भराडकर यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे लागले. त्यातच आदित्य ठाकरे यांच्याहस्ते याचे उद्घाटन पार पडणार असल्यानेही प्रभूंनाही राजकीय वैर बाजुलाा ठेवून भराडकर यांच्याशी पुन्हा सलोख्याने वागावे लागले.

अहिर यांचे दोन दगडांवर दोन पाय!

राष्ट्रवादी काँग्रेसमधून जेव्हा प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तेव्हा सचिन अहिर हे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी लाड यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु सन २०१९च्याा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याच सचिन अहिर यांनी शिवसेनेशी सलोखा करत आदित्य ठाकरेंचे विश्वासू म्हणून मर्जी संपादन केली. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ज्याने आपल्या आमदारीच्या पदाचा त्याग केला, त्या सुनील शिंदे यांच्यापेक्षाही आदित्य ठाकरे यांचा अहिर यांच्यावर अधिक विश्वास आहे. आज वरळीत अहिर यांच्याशिवाय आदित्य ठाकरेंचे पान हलत नाही. परंतु दुसरीकडे अहिर यांचे अधूनमधून आपल्या जुन्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवरही लक्ष असून तेही यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. महा विकास आघाडीमुळे अहिर यांना राष्ट्रवादीतील नगरसेवकांच्या संपर्कात राहणे अगदी सोपे झाले आहे. यापूर्वी महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव आणि त्यानंतर आता धनश्री भराडकर यांच्या प्रभागातील कोविड सेंटर असो वा लसीकरण केंद्र असो याला आदित्य ठाकरेंची उपस्थिती लावून त्यांच्याहस्ते याचे उद्घाटन करून घेण्यासाठीही अहिर यांनीच महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात अहिर यांना शिवसेनेत स्वत:च्या समर्थकांचा एक मोठा गट तयार करायचा आहे, त्यादृष्टीकोनातून ही पावले उचलली जात असल्याचेही बोलले जात आहे. तसेच भविष्यात शिवसेनेत न करमल्यास पुन्हा जुन्या पक्षात जाण्याची वेळ आल्यास हेच समर्थक कायम ठेवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.