काँग्रेसच्या ज्या कोणत्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कौतुक करतात, तो नेता काँग्रेसला सोडून जातो, हे गुलाम नबी आझाद यांच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. संसदेत पंतप्रधान मोदी आझाद यांच्या विषयी बोलताना प्रचंड भावुक झाले होते, त्यानंतर काहीच महिन्यांत आझाद यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली, हीच परिस्थिती पुन्हा उद्भवणार का, अशी शंका खुद्द काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केली आहे. याला कारण आहे एका सभेत पंतप्रधान मोदी यांनी आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता गेहलोत चर्चेत आले आहेत.
गेहलोत यांनी काँग्रेस हायकमांडची नाराजी ओढवून घेतलेली
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गेहलोत चांगलेच चर्चेत आले होते. कारण गेहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेहलोत यांनी काँग्रेसच्या हायकमांडची नाराजी ओढवून घेतल्याने त्यांच्यावर काँग्रेसमधूनच टीका होऊ लागली होती. आता याच गेहलोत यांचे राजस्थानच्या मानगड, बांसवाडा येथे एका व्यासपीठावर पंतप्रधान मोदी आले तेव्हा त्यांनी भाषणात मुख्यमंत्री गेहलोत यांचे कौतुक केले. यावर उत्तर देताना सचिन पायलट यांनी शंका उपस्थित केली असून, त्यांनी राज्यसभेत पंतप्रधानांनी गुलाम नबी आझाद यांची स्तुती केल्याचे उदाहरणही सचिन पायलट यांनी दिले आहे.
(हेही वाचा होळीबाबत ‘गुगल’चे पंचांग चुकले…)
काय म्हणाले सचिन पायलट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे कुठे जातात, तिथे त्यांचा सन्मान होतो, असे गेहलोत म्हणाले होते. त्यापाठोपाठ मोदींनीही त्यांचे कौतुक केले होते. अशोक गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले होते. ते देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्याशिवाय ते अनुभवी राजकारणीही आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशोक गेहलोत यांचे कौतुक केल्याबाबत बोलताना सचिन पायलट यांनी सूचक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मला वाटते हा फार महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले होते. त्यानंतर काय झाले हे आपण सगळ्यांनी पाहिले. त्यामुळे आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले, ही बाब विशेष आहे. ही घटना आपण सहजपणे घ्यायला नको, असे सचिन पायलट म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community