महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील काँग्रेस पदाधिका-यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे काँग्रेसमधील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत. या नाराजीमुळेच आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत सचिन सावंत?
अतुल लोंढे यांना काँग्रेसचे प्रवक्ते पद दिल्याने सचिन सावंत यांनी नाराज होऊन आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 10 वर्षांपासून सचिन सावंत यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषविले आहे. तसेच राज्यात आपल्या आक्रमक शैलीने सावंत यांनी कायमंच विरोधी पक्षांवर टीका केली आहे. महाविकास सरकार सत्तेत आल्यावर देखील त्यांनी भाजपा नेत्यांना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवणार असल्याची चर्चा काही काळ रंगली होती.
(हेही वाचाः स्त्रियांनो, तणावापासून मुक्तीसाठी दोन पेग पिऊन झोपा! काँग्रेसच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला)
म्हणून सावंत नाराज
मंगळवारी झालेल्या राज्यातील कांग्रेस पदाधिका-यांच्या नियुक्त्यांमध्ये सचिन सावंत यांना डावलण्यात आल्यामुळे, त्यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. नव्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्याच समर्थकांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. अतुल लोंढे हे कट्टर पटोले समर्थक असल्यानेच त्यांची कांग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community