सचिन वाझे यांचे गॉडफादर मुख्यमंत्री! नारायण राणेंचा आरोप

सचिन वाझे हे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला.

94

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला असून, सचिन वाझे यांचे गॉडफादर मुख्यमंत्री ठाकरे हेच असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणले!

वाझे प्रकरणामुळे बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे आणि त्यात केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन वाझे यांना पोलीस खात्यात आम्ही आणले नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि परमबीर सिंग सांगत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचे स्पष्ट होत आहे. परमबीर सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने असून, वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच वाझेंचे गॉडफादर आहेत आणि मनसुख हिरेन यांना मारण्याचे पाप वाझे यांनीच केले आहे, असा आरोप करतानाच, वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल त्यांनी करून, या प्रकरणात गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.

(हेही वाचा : धक्कादायक! तिरुपती बालाजी मंदिरातील मानवी केसांची चीनकडून तस्करी!)

सचिन वाझे हे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये रहायचे!

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी अजून एक खळबळजनक आरोप केला. सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्री ठाकरे यांना माहीत आहे. सचिन वाझे हे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोटही नारायण राणे यांनी यावेळी केला. वाझे यांचे उद्योग काय होते आणि ते काय करीत होते, याची सर्व माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना होती, असा दावाही राणे यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.