अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला मंगळवारी दुपारी भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्याच्यावर या रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिस सूत्रांनी दिली आहे. सोमवारीच वाझेला शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्याची परवानगी न्यायालायने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ओपन हार्ट सर्जरी होणार!
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याचे साथीदार अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तुरुंगात असताना सचिन वाझे याचा छातीत दुखू लागल्यामुळे त्याच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते. वाझेला हृदयविकार असून त्याच्या हृदयात ३ ब्लॉकेज असल्यामुळे ओपन हार्ट सर्जरीची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान हि शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात करण्यात यावी, अशी मागणी वाझेने अर्जाद्वारे एनआयए न्यायालयात केली होती. सोमवारी त्याच्या या अर्जावर एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्याच्यावर सुनावणी देत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली होती, मात्र शस्त्रक्रियेचा खर्च स्वतः करायचा, असे न्यायालायने म्हटले होते.
(हेही वाचा : तालिबान्यांचे अमानुष कृत्य : नागरिकाला हेलिकॉप्टरला लटकावून काढली धिंड!)
रुग्णालयाचे नाव मात्र गुपित!
खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळताच मंगळवारी दुपारी भिवंडी येथील एका खाजगी रुग्णालयात सचिन वाझेला दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केव्हा होणार हे लवकरच ठरवण्यात येणार आहे. सचिन वाझेसोबत रुग्णालयात त्याच्या पत्नीला राहण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. वाझेच्या सुरक्षेसाठी रुग्णालयाचे नाव देण्यास पोलिसांनी नकार दिला असून या रुग्णालयाच्या बाहेरिल व आतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
डॉक्टरांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी असे सांगितले की, वाझे यांना शुगर कंट्रोल असल्याचे व त्याचे २९ तारखेला जे.जे. हॉस्पिटल येथे ब्रेन एमआरआय केले असून ते नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आरोपी सचिन वाझे याची हॉस्पिटला २ डी इको आणि एंजोग्राफी करुन त्याच्यावर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जरी करायचे आहे काय हे ठरणार आहे. हॉस्पिटलमध्ये आरोपी सचिन वाझे याच्यासाठी पहिल्या माळ्यावर एक आयसीयू रूम तयार करण्यात आलेला आहे. या रूमच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रूमच्या बाहेर तसेच आत जेल, स्थानिक पोलिस स्टेशन, गुन्हे अन्वेषण विभाग यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आरोपी असलेल्या रूममध्ये कोणाचाही मोबाईल फोन आत जाणार नाही याची दक्षता घेतली असून हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स, स्टाफ तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व अमलदार यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत रूमच्या बाहेर रजिस्टर ठेवण्यात आलेले आहे, त्यामध्ये एन्ट्री एक्झिट याची नोंद घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community