सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्यासाठी मुभा दिली जातेय! देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

मी सीडीआर मिळवला म्हणून माझी चौकशी करा, ज्यांनी खून केला त्याचीही चौकशी करा, खुनी शोधण्यासाठी मी त्या पलीकडे जाऊनही माहिती मिळवून आणीन, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना बडतर्फ करायला हवे, तुम्ही पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मुभा देत आहात, ते एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांना वाचवले जात आहे. सचिन वाझे यांना पाठिशी घालून गृहमंत्री कुणाला वाचवत आहेत, हे सर्वांना माहिती आहे. पूजा चव्हाण आत्महत्याबाबत हे काही करू शकले नाही. सचिन वाझे यांना बडतर्फ करा आणि आताच्या आता त्यांना अटक करा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात न्याय मिळतो म्हणू इथे येऊन आत्महत्या करतात! – गृहमंत्री 

त्यावर गृहमंत्री देशमुख म्हणाले कि, हा तपास एटीएसकडे देण्यात आलेला आहे. जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू, असे म्हटले. त्यावर विरोधक आक्रमक झाले आणि सरकारच्या विरोधात वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर होते. ते काही वेळा अपक्ष म्हणून देखील निवडून आले होते. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये प्रफुल्ल छेडा पटेल यांचे नाव लिहिले आहे. काही अधिकारी आणि प्रफुल्ल छेडा पटेल यांच्या माध्यमातून मला धमक्या येत होत्या, असे त्यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटले आहे. मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा प्रफुल्ल पटेल हे गृहमंत्री होते. महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास असल्याने मला न्याय तिथेच मिळेल, असे मोहन डेलकर यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये म्हटले होते. प्रफुल्ल छेडा पटेल यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांनी देखील आरोप केले आहेत. मोहन डेलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटी स्थापन करून करण्यात  येईल, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले. छत्तीसगडचे आयएएस अधिकारी राजेश श्रीवास्तव आहेत, त्यांनी महाराष्ट्रात नागपूरमध्ये येऊन आत्महत्या केली, यावरून महाराष्ट्रात न्याय मिळतो, म्हणून लोक इथे येऊन आत्महत्या करतात. मनसुख हिरेनबाबत जी घटना झाली ती दुर्दैवी आहे. विमला हिरेन यांचा जबाब सगळीकडे आहे. एटीएस या बाबतीत तपास करून सत्य बाहेर आणेल. विरोधकांनी देखील त्यांच्याकडे असलेली कागदे पत्र द्यावी. त्याचा तपास एटीएस निष्पक्षपणे करेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.त्यावर फडणवीस यांनी आक्षेप घेत, गृहमंत्री यांना राज्यात येऊन आत्महत्या करतात, हे भूषणावह वाटते का?, हे काय नवे डेस्टिनेशन झाले का?, असा सवाल केला.

(हेही वाचा : हिरेन मृत्यू प्रकरणात नवा गौप्यस्फोट… सचिन वाझेंना अटक करा- फडणवीसांची मागणी!)

सीडीआर मिळवला म्हणून माझी चौकशी करा! – फडणवीस 

यावेळी नाना पटोले यांनी विरोधी पक्ष नेत्यांना सीडीआर असे मिळाले?, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तेव्हा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी होय, मी सीडीआर मिळवला म्हणून माझी चौकशी करा, ज्यांनी खून केला त्याचीही चौकशी करा, खुनी शोधण्यासाठी मी त्या पलीकडे जाऊन माहिती मिळवून आणीन, सचिन वाझे यांना गृहमंत्री पाठिशी का घालत आहेत? यामध्ये कोण कोण आहेत? कुणाच्या दबावाखाली वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे?, असा प्रश्न केला .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here