दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचा मंत्रालयासमोर हल्लाबोल 

आमदार सदाभाऊ खोत यांनी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सचिवांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिले. 

161

कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी हवालदील असतानाच दुधाचे दर कमी झाले. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने १० जून रोजी दुधासाठी राज्यव्यापी आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयावर कूच करत दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांसह मंत्रालयासमोर दूध दरवाढीसाठी आंदोलन केले.

दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई नाही!

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गाईच्या दुधाला १८ ते २० रुपयांपर्यंत प्रति लिटर भाव मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/५ एसएनएफनुसार किमान २५ रुपये प्रति लिटर दर देणे आवश्यक आहे, परंतु या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या दूध संस्था व खाजगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकेच नाही, तर खाजगी दूध संस्थावर व खाजगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.

अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या!

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत FRP आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फ्लॅर्मुला आहे, त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फ्लॅर्मुला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्मुला कार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञानयुक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर हे आमचे गाईचे ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत. या जातींच्या गाईचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, असेही खोत म्हणाले. या सर्व मागण्यांसाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मंत्रालयासमोर आंदोलन केले. यानंतर दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. त्यावेळी सचिवांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिले.

(हेही वाचा : राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.