ज्याने या महाराष्ट्रात जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे. ती राजवट आज त्यांच्या डोळ्यासमोर, रावणाची सोन्याची लंका जळावी, तशी जळायला लागली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राम राज्याला सुरुवात होत आहे. याचा आनंद मला आणि गावगाड्यातील प्रत्येक माणसाला आहे, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक व्यवस्था; Devendra Fadnavis यांनी मांडली भूमिका)
देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळ गटनेता म्हणून निवडल्यानंतर आमदार खोत बोलत होते. खरे तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे शिपाई अथवा सैनिक म्हणून मैदानात लढत होतो. जसे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवले गेले, तसेच अनेक चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती तयार करण्यात आलेले होते. ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आनंद आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे, असे खोत म्हणाले.