पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला, काँग्रेसची बदनामी केली, त्यामुळे त्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे सकाळपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमला होता, मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचे कार्यकर्ते सागर बंगल्यापर्यंत पोहचू शकले नाही. नाना पटोले यांना जागेवरच आंदोलन करावे लागले.
सागर बंगल्यावर ना भाजप पोहोचले ना काँग्रेसवाले…
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याआधी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे नाना पटोले यांनी थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. त्यांच्या सागर बंगल्यावर हल्लाबोल करण्याचा इशारा पटोले यांनी दिला. त्याप्रमाणे सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी काँग्रेसने हे आंदोलन केले. मात्र त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर काँग्रेसचे कार्यकर्ते सागर बंगल्यावर आले, तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. त्याप्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांना सागर बंगल्याकडे येण्यास प्रतिबंध केला. त्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रतिबंध केला. त्यामुळे सागर बंगल्याकडे ना भाजपचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही, ना काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचू शकले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही जागेवरून हलू दिले नाही. त्यामुळे नाना पटोले यांना जागेवरच राहून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करावी लागली.
(हेही वाचा धक्कादायक! हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुसलमानांकडून व्हॅलेंटाईन पार्टीचे आयोजन)
आंदोलन केले स्थगित
अखेर पोलिसांनी हे आंदोलन न करण्याची विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली. पटोले यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने आहे त्या ठिकाणीच रस्त्यातच आंदोलन सुरू केले. बराच वेळ आंदोलन केल्यानंतर अखेर हे आंदोलन थांबवत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले, मात्र, आजचे आंदोलन थांबले असले तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे पटोले यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community