शिवाजी पार्क-दादर हा शिवसेनेचा गड मानला जात असून, या भागातील प्रभाग क्रमांक जुना १९१ व नवीन प्रभाग क्रमांक १९७ हा खुला झाल्याने प्रभागाचे आरक्षण जाहीर होताच, युवा सेनेच्या वाघाने या प्रभागाच्या दिशेने झेप घेण्यास सुरुवात केली आहे. माहिम दादर विधानसभेचे आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनी आपला मोर्चा प्रभाग क्रमांक १९७ मध्ये वळवला असून, सोशल मीडियावर वाघ चाल करून येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत प्रभाग क्रमांक १९७ मध्ये शिवसेनेचा वाघ कार्यसम्राट युवा नगरसेवक लवकरच अशाप्रकारचा संदेश देण्यात आला आहे.
(हेही वाचाः मंत्री अनिल परबांच्या विश्वासूंनाही बसावे लागणार घरी)
सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ व्हायरल
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९१(नवीन १९७)मध्ये शिवसेना नगरसेविका सभागृह नेत्या विशाखा राऊत असून, हा प्रभाग मंगळवारी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणात खुला प्रवर्गातील प्रभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक १९४(२०१) समाधान सरवणकर हे नगरसेवक असून, हा प्रभाग आता महिला आरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आहे. परंतु प्रभागांचे आरक्षण जाहीर होताच समाधान सरवणकर यांनी सोशल मिडियाद्वारे व्हिडिओ व्हायरल करत प्रभाग १९७ मध्ये शिवसेनेचा वाघ येणार असल्याची कल्पना दिली आहे.
(हेही वाचाः अनुसूचित जातीचे प्रभाग बनले अनूसूचित जमाती)
व्हिडिओची चर्चा
सभागृह नेत्या विशाखा राऊत यांचा प्रभाग खुला होण्याची शक्यता असल्याने समाधान सरवणकर यांनी या प्रभागात आधीपासून फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नगरसेविका राऊत आणि सरवणकर यांच्यातून विस्तव जात नव्हता. या दोघांमधील वाद खुद्द मातोश्रीपर्यंत पोहोचला असून, समाधान सरवणकर यांनी आरक्षणानंतर राऊत यांच्या प्रभागातच दावेदारी सांगण्यास सुरुवात केली. समाधान यांच्या समर्थकांनी अशाप्रकारचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला असल्यामुळे दादरमध्ये या व्हिडिओची भारीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
(हेही वाचाः आशिष चेंबूरकर, गंगाधरे, बब्बू खान, सुषम सावंत यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका)
Join Our WhatsApp Community