पेंग्विनवरील खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची ‘या’ पक्षाने केली मागणी!

पेंग्विन व्यक्तीरिक्त प्राणिसंग्रहालयाच्या सुधारणाकरता मागील पाच वर्षांत महापालिकेने किती खर्च केलेला आहे आणि एकूण कामांच्या सर्वच निविदा या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामांसाठी अनुकूल नाहीत का, असा सवाल समाजवादी पक्षाने केला.

59

पेंग्विन पक्षी आल्यानंतर राणीबागेतील तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नात वाढ होवून पेंग्विनमुळे अतिरिक्त महसुलातही वाढ झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे राणीबागेतील उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या मागील २०१७ ते आजपर्यंत असे एकूण पाच वर्षांचे मिळालेले उत्पन्न आणि झालेला खर्च यांची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी केली आहे. राणीबागेच्या महसुलात झालेली वाढ पेग्विनमुळे झालेली नसून प्रवेश शुल्काच्या स्वरुपात आकारण्यात येणाऱ्या तिकीट दरात वाढ केल्यानेच झाली असल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.

१५ कोटी रुपयांचा खर्च म्हणजे महापालिकेचा तोटा

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीबाग) पेंग्विन पक्षी दाखल झाल्यापासून प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पेंग्विन पक्षी महापालिकेने संग्रहालयात आणल्यानंतर २०१७पासून पालिकेला १२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच पेंग्विनमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत नसल्याचेही महापालिकेने म्हटले आहे. परंतु पालिकेने पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील तीन वर्षांकरता १५ कोटींचे कंत्राट देण्याकरता निविदा मागवण्यात आली आहे. महापालिकेचे उत्पन्न बुडालेले असतानाच पेँग्विनवर इतका खर्च करणे योग्य नसल्याचे मत स्पष्ट करत समाजवादी पक्षाचे गटनेते आमदार रईस शेख यांनी १५ कोटी रुपयांचा खर्च म्हणजे महापालिकेचा तोटा असल्याचेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा : शरद पवार म्हणतात, ‘काँग्रेस रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार!’)

प्राणिसंग्रहालयाच्या सुधारणाकरता किती खर्च केला?

पेंग्विनमुळे कोट्यवधींचा महसूल मिळाला असल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयाच्या उत्पन्न आणि खर्चावरील मागील ५ वर्षांपासूनची श्वेतपत्रिका काढण्यात यावी आणि याची चौकशी करून सविस्तर माहिती देण्याची मागणी शेख यांनी केली आहे. महापालिकेने ६ जुलै २००७ मध्ये राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्क वाढीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही, असे प्रशासनाचे मत आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय याठिकाणी ५ वर्षात एकूण किती पर्यटकांनी भेट दिलेली आहे? पेंग्विनच्या ठिकाणाला एकूण किती पर्यटकांनी भेट दिलेली आहे आणि त्यापासून महापालिकेला किती महसूल प्राप्त झाला आहे. तसेच पेंग्विन व्यक्तीरिक्त प्राणिसंग्रहालयाच्या सुधारणाकरता मागील पाच वर्षांत महापालिकेने किती खर्च केलेला आहे आणि एकूण कामांच्या सर्वच निविदा या उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामांसाठी अनुकूल नाहीत का, असाही सवाल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.