समाजवादी पक्षही मराठी माणसांच्या प्रेमात

पक्षाच्यावतीने जारी सोशल मिडियावरील माहिती व प्रचारात ५० टक्के मराठी भाषेचा वापर केला जाणार आहे.

आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेससोबत समाजवादी पक्षाची डबल सिटवरून चालण्याची तयारी केलेली असताना त्यांनी मराठी व्होट बँककडेही आपले लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखली आहे. आजवर केवळ हिंदी आणि ऊर्दु भाषेचाच अवलंब करणाऱ्या समाजवादी पक्षाने आता पक्षाच्या कामकाजात आणि प्रचारात ५० टक्के भाषेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन आकडी सदस्य संख्या पार करण्याचा निर्धार

मुंबईत आजवर समाजवादी पक्षाची ताकद ना वाढलेली आहे ना कमी झालेली आहे. त्यामुळे आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पक्षाने आजवरच्या सरासरी सहा नगरसेवकांच्या पुढे जावून दोन आकडी सदस्य संख्या पार करण्याचा निर्धार केला आहे. आगामी निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने युती केल्यास याचा फायदा काँग्रेसलाच मिळू शकतो. समाजवादी पक्षाऐवजी काँग्रेसला अधिक फायदा होईल, परंतु त्यासोबत समाजवादी पक्षालाही काही जागांवर यश मिळवता येईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण मुंबईत समजावादी पक्षाने २२७ पैकी १२० जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले. त्यामुळे केवळ मुस्लिम व्होट बँकवर अवलंबून राहून निवडणूक लढवता येत नाही, तर मुंबईत मराठी मतेही आपल्या पार पारड्यात पडणे आवश्यक आहे, याची खात्री पटल्याने समाजवादी पक्ष जो केवळ मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजा पुरता विचार करत होता, तो आता भविष्यात मराठी माणसांना जवळ करताना दिसणार आहे.

पक्ष कार्यात ५० टक्के मराठी भाषेचा होणार वापर

मुंबईतील मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यानंतर आता वेगळाच मार्ग निवडल्याने मराठी माणसांकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे शिवसेनेपासून मराठी माणूस लांब होवू लागला. या मराठी माणसाला मनसेने जवळ केले. तरीही मराठी माणसांची मते हीसुध्दा महत्वाची असल्याने भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी कट्टा ही मोहीम राबवून मराठी माणसांना एकत्र आणत भाजपने मराठी व्होट बँककडे आपले लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यातच आता समाजवादी पक्षाने मुस्लिम समाज आणि उत्तर भारतीय समाजासोबत मराठी माणसांना आपलेसे करून घेण्याचा निर्धार केलेला आहे. समाजवादी पक्षाने सध्या पक्षाच्यावतीने जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, प्रसिध्दी पत्रके, जनजागृती मोहीम यासह अनेक कार्यक्रमांची माहिती मराठी भाषेतून देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्यावतीने जारी सोशल मिडियावरील माहिती व प्रचारात ५० टक्के मराठी भाषेचा वापर केला जाणार आहे. समाजवादी पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी पक्षाचे कार्य आता मराठी भाषेतही जनतेपर्यंत पोहोचवले जाईल, असे स्पष्ट केले. पक्षाच्यावतीने जारी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमांची माहिती तसेच संदेश हे ५० टक्के मराठी भाषेतून प्रदर्शित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here