राज्यातील ‘नाचे’ आमदार केंद्राच्या तालावर नाचताहेत; ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका

104

रविवारी दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा होता. या मेळाव्यात नाराज आमदारांच्या बाॅड्या आणण्याचे संजय राऊतांचे वक्तव्य चर्चेत असताना, सामनाच्या अग्रलेखातून नाराज आमदारांना ‘नाच्या’ म्हणत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेच्या 15 नाराज आमदारांना केंद्राने वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयावर सामन्याच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

भाजपच्याच तालमीत महाराष्ट्रद्रोहाचा फड

देशभरात ‘वाय’ वाल्यांची फौजच त्यांना उभी करायची आहे काय? त्यांच्या याच फौजेत आता गुवाहाटीमध्ये असलेल्या 15 गद्दार ‘नाच्यां’ ची भर पडली आहे. त्यांनाही केंद्राने वाय प्लस सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय-झेड’ करणारा तर आहेच, शिवाय गुवाहाटीत सुरु असलेल्या महाराष्ट्रद्रोहाच्या तमाशाचा फड भाजपच्याच तालमीत सुरु असल्याचा पुरावादेखील आहे. भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचे पितळ त्यामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे. या वग नाट्याचे सूत्रधार आणि दिग्दर्शक नेमके कोण आहेत, हे उघड झालेच आहे, असे सामनाच्या लेखात म्हटले आहे.

हे 15 आमदार म्हणजे जणू लोकशाही स्वातंत्र्याचे रखवाले

अखेर गुवाहाटी प्रकरणात भाजपचे धोतर सुटले. शिवसेना आमदारांचे बंड हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे हे लोक दिवसाढवळ्या सांगत होते, पण बडोद्यात म्हणे श्रीमंत देवेंद्र फडणवीस आणि अतिश्रीमंत एकनाथ शिंदे यांची काळोखात गुप्त भेट झाली. त्या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सामील होते. त्यानंतर लगेच बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय दर्जाची विशेष सुरक्षा पुरवण्याचे आदेश काढले. हे 15 आमदार म्हणजे जणू लोकशाही स्वातंत्र्याचे रखवाले आहेत. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का लागू नये, असे केंद्राला वाटते काय? खर तर हे लोक 50-50 कोटी रुपयांत विकले गेलेले बैल किंवा बिग बुल आहेत. लोकशाहीला लागलेला हा कलंक आहे. तो कलंक सुरक्षित ठेवण्यासाठी काय हा आटापिटा? असे प्रश्न विचारत सामनाच्या लेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

( हेही वाचा ‘मित्र संपवले, राऊतांसारखा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला मिळू नये’, शिंदे गटाने व्यक्त केली नाराजी )

केंद्राने होलसेल मधे दिलीय सुरक्षा

केंद्रातील भाजप सरकारचा हा महाराष्ट्रद्वेष नवीन नाही. याआधीही मुंबई आणि महाराष्ट्राशी उघड द्रोह करणा-यांना केंद्र सरकारने वायपासून झेडपर्यंत सुरक्षा दिलीच आहे. महाराष्ट्रावर चिखलफेक करणारी बेताल नटी कंगणा राणावत, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे आरोप करुन चिखलफेकीचे कंत्राट घेतलेले महात्मा किरीट सोमय्या, पवार कुटुंबियांविरोधात बेताल आरोप करणारे सदाभाऊ खोत यांसह अनेकांना केंद्र सरकारने आतापर्यंत होलसेलात वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे, असे सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.