ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाच्या वादाचा पेच वाढत चालला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे. तर मशाल हे आमचेही चिन्ह असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे. समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
समता पार्टीचे मशाल हे चिन्ह 2004 नंतर वापरलेले नाही, असे स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला हे चिन्ह दिले आहे. मात्र 2014 आणि 2021 मध्ये बिहार ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही हेच चिन्ह वापरल्याचा दावा देवळेकर यांनी केला आहे. असे असेल तर या दोन निवडणुकांमध्ये आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणुका लढवल्या? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असा सवाल देवळेकर यांनी केला आहे.
1994 पासून राष्ट्रीयीकृत मशाल हे चिन्ह आमचे असल्याचा दावा देवळेकर यांनी केला आहे. शिवसेनेच्या नव्या चिन्हाबाबत हरकत घेत समता पार्टी यांनी निडवणूक आयोगाकडे हे चिन्ह आमचे असल्याचा दावा केला आहे. धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेनेला जसे दु:ख झाले, तसे दु: ख आम्हाला नाही होत का, असा सवाल देवळेकर यांनी केला आहे.
( हेही वाचा: शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीवर निर्णय नाहीच; आता खंडपीठासमोर होणार सुनावणी )
सुरक्षा देण्याची देवळेकर यांची मागणी
तसेच, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचेही चिन्ह धनुष्यबाण आहे. या पक्षाने महाराष्ट्रात येऊन धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली तर शिवसेनेला चालेल का? असा सवालही देवळेकर यांनी केला आहे. या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत जाहीर करण्याचे आवाहन देवळेकर यांनी केले आहे. मशाल या चिन्हावरुन सुरु असलेल्या वादामुळे समता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. यासाठी आपल्याला सुरक्षा प्रदान करण्याची मागणीही देवळेकर यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community