मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी संभाजीनगर येथे भव्य सभा घेतली होती. त्यावेळी पोलिस प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संभाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात राज ठाकरेंविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबाबत आता संभाजीनगर पोलिसांकडून राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी घातल्या होत्या अटी
1 मे रोजी संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदान येथे राज ठाकरे यांची भव्य सभा झाली होती. या सभेपूर्वी संभाजीनगर पोलिसांकडून राज ठाकरे यांना 16 नियम व अटी घालून देण्यात आल्या होत्या. या अटींचा भंग करू नये आणि कोणाच्याही भावना दुखावतील अशाप्रकारचे प्रक्षोभक भाषण करू नये, अशा सूचनाही पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या.
(हेही वाचाः झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी जाणार, निवडणूक आयोगाची राज्यपालांकडे शिफारस)
अटींचं उल्लंघन गेल्याप्रकरणी आरोप
पण या सभेदरम्यान राज ठाकरेंकडून पोलिसांनी घालून दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता संभाजीनगर सत्र न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पुढील सुनावणीसाठी राज ठाकरे यांना संभाजीनगर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community