राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करणार आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं निमित्त साधून या क्रांतीला सुरूवात होणार आहे. यासंदर्भात संभाजीराजेंनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. “क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात… भेटूया 9 ऑगस्ट रोजी तुळजापूरला…” असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांना तुळजा भवानी मंदिरात प्रवेश नाकरण्यात आला होता. यामुळे वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. यामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात करणार असल्याचे ट्वीटद्वारे सांगितले आहे. त्यामुळे आता येत्या 9 ऑगस्ट रोजी नेमके काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचा- शिंदे गटातील आमदारांच्या गाड्या फोडण्याचे केले होते आवाहन; थोरात यांना पुणे पोलिसांकडून अटक)
क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात…
भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला…#स्वराज्य
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 3, 2022
या ट्वीटनंतर पुन्हा एकदा संभाजीराजे अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसणार आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली होती. 12 मे रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले होत. यासोबतच स्वराज्य या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच या संघटनेचा प्रसार करण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असेही संभाजीराजे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community