मराठा समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मंत्रालयात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दलनाबाहेर तब्बल दीड तास ताटकळत राहिल्यानंतरही त्यांना भेटीसाठी वेळ न दिल्याने राजे मंत्रालयातून तडकाफडकी निघून गेले. हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःहून फोन करीत राजेंची मनधरणी केली आणि सह्याद्री अतिथीगृहावर दोघांची भेट झाली.
मंत्रालयात आल्यावर संभाजीराजे यांनी प्रथम सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली. समाजाच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक व्हावी. प्रत्येक उमेदवारास त्याची हक्काची नोकरी मिळावी, यासाठी खात्यांतर्गत समन्वय साधण्याकरिता शासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी सूचना केली. भांगे यांच्यासोबतची बैठक संपल्यावर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. त्यांच्यासोबत स्वराज्य संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
(हेही वाचा – ‘वेदांता प्रकल्प’ महाराष्ट्रात होताच कधी?, ‘या’ प्रकरणाची चौकशी व्हावी, शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)
मात्र, मुख्यमंत्र्यांनी तब्बल दीड तास संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ दिली नाही. याकाळात ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. बराच काळ ताटकळत उभे राहिल्यानंतर नाराजी व्यक्त करीत संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले.
अशी केली मनधरणी
संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना कळताच त्यांनी तातडीने राजेंना फोन करण्याची सूचना केली. मात्र, राजेंनी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना पुन्हा येण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संभाजीराजे यांना फोन केला आणि ‘मी स्वतः तुम्हाला भेटायला येण्यासाठी निघतोय, कुठे येऊ’, अशी विचारणा केली. त्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भेट घेणे प्रोटोकॉलला धरून राहणार नाही. मीच येतो, असे सांगून राजेंनी रुसवा सोडला. त्यानंतर सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांची भेट झाली.
Join Our WhatsApp Community