भारतमातेच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला; संभाजीराजेंनी रायगडावर केले ध्वजारोहण

142

भारताचा स्वातंत्र्यदिन सोमवारी देशभरात साजरा होत आहेत. दरम्यान, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.

दरम्यान, आपल्या पोस्टमधून संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी मोडला स्वतःचाच रेकॉर्ड; सर्वाधिक वेळ केलं स्वातंत्र्यदिनाचं भाषण)

६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला. स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, अशा भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्ट मधून व्यक्त केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.