मराठा समाजाविषयी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या राज्य सरकारसोबतच्या बैठकीत मान्य झाल्या आहेत, काही मागण्यांसाठी सरकारने २१ दिवसांचा वेळ मागितला आहे. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ देत आहोत, तोवर आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजी राजे यांनी नाशिक येथे मूक आंदोलनानंतर पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील समन्वयकांच्या बैठका, दौरे सुरु राहणार!
मराठा समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला…असे म्हणत आता सामान्य मराठा समाजाला आम्हाला वेठिस धरायचे नसून आता तोडगा हवा आहे. आरोप – प्रत्यारोप बंद करून तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूरच्या आंदोलनानंतर सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलावले, त्यावेळी आमच्या बहुतांशी मागण्या सरकारने मान्य केल्या. मराठा समाजाचा कणा असलेल्या सारथी संस्थेच्या सर्व मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्य झाल्या. सारथीच्या उपकेंद्रासाठी कोल्हापुरात तीन जागांच्या निवडीवरही चर्चा झाली. आम्ही केलेल्या मागण्या सरकारने २१ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आम्ही मराठा क्रांती मूक आंदोलन एक महिन्यापर्यंत स्थगित केले असून त्या दरम्यान जिल्ह्यातील बैठका, दौरे सुरू असणार आहेत, असेही खासदार संभाजी राजे म्हणाले.
(हेही वाचा : आदित्यच्या लिस्टमध्ये संजय राऊत ‘ब्लॅकलिस्ट’? काय आहे कारण?)
मराठा समाजाच्या विकासासाठी हजारो कोटींची तरतूद!
सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर अतिशय उग्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे सरकारने समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. समाजासाठी काही हजार कोटींची जी मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी सरकारला २१ दिवसांचा वेळ देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मराठा समाज खूश होईल एवढी रक्कम आम्ही २१ दिवसांत जाहीर करु. तेवढा वेळ द्या, असे आवाहन पवारांनी केल्यामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचा वेळ द्यायचे ठरवले आहे, असे संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केले.
ओबीसी, धनगर आंदोलनालाही पाठिंबा!
आपण केवळ मराठा आरक्षणालाच नाही, तर धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देणार आहे. सर्व बहुजन समाजाला एकत्र करून त्यांचा विकास करण्यासाठी आपला प्रयत्न असेल, असेही खासदार संभाजी राजे म्हणाले.
(हेही वाचा : संभाजी राजे जमिनीवर, भुजबळ खुर्चीवर! मूक आंदोलनात काही काळ तणाव! )
Join Our WhatsApp Community