संभाजी राजे जमिनीवर, भुजबळ खुर्चीवर! मूक आंदोलनात काही काळ तणाव! 

मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत, असे भुजबळ म्हणाले.

89

संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी, २१ जून रोजी नाशकात मूक आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनस्थळी आधीच भाजपचे खासदार संभाजी राजे आणि मराठा आंदोलक जमिनीवर बसले होते, त्यानंतर मात्र जेव्हा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आंदोलनस्थळी आले आणि थेट खुर्चीत येऊन बसले. त्यावेळी ‘संभाजी राजे जमिनीवर बसले असताना भुजबळ खुर्चीत का बसले?’, असा सवाल करत मराठा आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र ‘त्यांना शारीरिक त्रास असल्याने त्यांना खुर्चीत बसू द्यावे’, असे संभाजी राजे यांनी म्हटल्यावर वातावरण शांत झाले.

मराठा आरक्षणासाठी समाजाला रस्त्यावर उतरवून २ मिनिटांत वातावरण गढूळ करता येऊ शकते. मात्र आम्ही राजघराण्यातील असून आम्हाला समंजस्याने हा विषय सोडवायचा आहे. या विषयावर आजवर आम्ही बोललो, आता राज्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी बोलायचे आहे. आम्हाला तर अवघ्या बहुजन समाजाला एकत्र आणून त्यांचे हित जोपासायचे आहे.
– संभाजी राजे, खासदार.

आमदार बनकर यांच्यामुळेही तणाव! 

खुर्चीचा वाद मिटल्यावर छगन भुजबळ यांनी देखील आंदोलनस्थळी मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल खुलासा केला. मला पाठीचा त्रास असल्याने मी खुर्चीवर बसलो होतो, असे ते म्हणाले. त्यानंतर निफाडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल बनकर यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साहाय्याने सोडवला जाईल, असे म्हटले. त्यांनतर पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कुणाचेही नाव घेऊ नये, असे आंदोलनकर्ते म्हणू लागल्यावर पुन्हा एकदा संभाजी राजे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. या आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या आमदार, खासदारांनी आपली भूमिका मांडून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

(हेही वाचा : धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान! )

आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाही! – छगन भुजबळ 

माझा किंवा राष्ट्रवादीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याचे जाणीवपूर्वक चित्र निर्माण केले जात आहे. माझी आणि संभाजी राजेंची भेट होते आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींचे  आरक्षण काढले, त्यामुळे दोन्ही समाजासमोर ही अडचण निर्माण झाली आहे, असे भुजबळ म्हणाले. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर अडचणी निर्माण होतात. काही लोक ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, सामाजिक तेढ निर्माण होण्याचे कारण नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाला मी कायम सभागृहातदेखील पाठिंबा दिला, असेही भुजबळ म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.