राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून, आता खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी रविवारी रायगडावरुन सांगितले. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरुन हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. 348व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
तर गप्प बसणार नाही
आधीचे आणि आजचे सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे, त्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात, पण आता मी संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल, मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही समाजाचा खेळ केलात तर आम्ही गप्प बसणार नाही, असे सांगत त्यांनी थेट आंदोलनाची घोषणा केली.
(हेही वाचाः “योग्य वेळी ताकद दाखवून देऊ!” संभाजी राजेंच्या या इशाऱ्यामागे दडलंय काय? )
मी आवाज उठवायचा नाही का?
मी राजकारणी नाही, राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणे ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली, या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळे सांगितले नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असे देखील संभाजी राजे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community