अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली, असा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र त्यावर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच जात पडताळणी समितीने नुकताच वानखेडे मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा निकाल दिला होता.
या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात भादंवि १८६० च्या कलम ५००, ५०१ आणि अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ च्या कलम ३ (१) (यु) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लीम नसून हिंदू महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा जात पडताळणी समितीने दिला नुकताच दिला. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले. त्यानंतर वानखेडे यांनी सध्या तुरुंगात असलेल्या मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी मोडला स्वतःचाच रेकॉर्ड; सर्वाधिक वेळ केलं स्वातंत्र्यदिनाचं भाषण)
काय म्हटले जबाबात
जबाबात वानखेडे यांनी म्हटले की, जानेवारी २०२१ मध्ये मी एनसीबी, मुंबई येथे कार्यरत असताना नवाब मलिक यांचे जावई समीर खान, करण सजनाने शाहिस्ता फर्निचरवाला या लोकांना ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात समीर खान यांना जामिनावर मुक्त केले आहे. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी कोर्डिलिया क्रूज ड्रग्स केस दाखल करण्यात आली. त्यामध्ये २० जणांना अटक करण्यात आली. तेव्हापासून मलिक व्यक्तिगत टीका, आरोप हे विविध प्रसार माध्यमातून करत होते. माझ्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली असून ती सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, मलिक यांना मी आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य चालू ठेवल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबाबत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर मलिक यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यानंतरही मलिक यांनी त्यांचे आरोप चालूच ठेवले होते.
व्यक्तिगत टीका, आरोप
२८ डिसेंबर रोजी मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर माझ्या जात प्रमाणपत्राबाबत वक्तव्य केले होते. मलिक यांनी त्यांची व्यक्तिगत टीका, आरोप हे २३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सतत चालूच ठेवले होते. २१ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबर २०२१ रोजी आणि नजीकच्या मागील इतर दिवशी मलिक यांनी पत्रकार परिषद आणि प्रसारमाध्यमांद्वारे असे जाहीर केले की, मी जन्मत: मुस्लिम असून माझ्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय पण बोगस आहेत. मी खोट्या जातीचे प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेली आहे आणि सरकारी नोकरी खोटी जात असल्यामुळे जाईल, अशा धमक्या देत होते.
हेतूपुरस्सर त्रास, अपमान
माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जात महार असून, मलिक यांनी अनेक लोकसेवकांना खोटी माहिती देऊन त्यांच्या अधिकाराचा वापर होण्यास प्रवृत्त केल्यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना हानी पोहोचलेली आहे. आमचे मूळ गाव वरुड तोफा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम हे असून आम्हाला सर्व जण महार जातीचे म्हणून ओळखतात व त्याचप्रमाणे सन्मान देतात. सरकारी नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काही जण व विशेषतः मी आणि माझे कुटुंब हे मुंबई व मुंबई परिसरात वास्तव्यास आहोत. मलिक यांनी हेतूपुरस्सर, जाणीवपूर्वक व केवळ महार मागासवर्गीय असल्यामुळे त्रास, अपमान करण्यासाठी व खोटी माहिती पुरवून संबंधित अधिकारी यांच्याकडून त्रास निर्माण करण्यासाठी वरील प्रमाणे वक्तव्य केलेले आहे. आमदार तथा महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री असतानाही एक महार अनुसूचित जातीचा अधिकारी त्यांच्या जावयाला अटक करू शकतो, या कारणाने द्वेष भावनेने हेतूपुरस्सररित्या मी आणि माझे कुटुंब हे महार जातीचे नाहीत व जातीच्या आधारावरती गैरफायदा घेत आहोत, असा खोटा प्रचार व वक्तव्य मलिक सतत करत होते.
मी आणि वडिलांनी धर्मांतर केलेले नाही
माझे लग्न शबाना कुरेशी यांच्याशी होण्यापूर्वी मी केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीत रुजू झालेलो आहे. त्यामुळे मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. तसेच, मी स्वतः अथवा माझे वडील यांनी आज रोजीपर्यंत धर्मांतर केलेले नाही. तरी मी अनुसूचित जाती व प्रवर्गात प्रवर्गाचा सदस्य असल्यामुळे मलिक यांनी माझा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५००, ५०१ आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम १९८९ कलम ३(१)(यु) अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी विनंती समीर वानखेडे यांनी जबाबात केली आहे.