मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून त्यामाध्यमातूनही बक्कळ पैसे कमावण्याची शक्कल लढवणारा कंत्राटदार मेसर्स मॉन्टे कार्लो लि. गोत्यात सापडला आहे. त्याला तब्बल ३२८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, मात्र न्यायालयाने हा दंड भरावाच लागेल, असे स्पष्ट सांगितले आहे.
कारवाईवरील अंतरिम स्थगितीही अमान्य!
जालन्याचे तहसीलदार यांनी या कंत्राटदाराला हा दंड ठोठावला आहे. या दंडाविरुद्ध कंत्राटदार कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी फेटाळून लावल्या. इतकेच काय तर उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत कारवाई वरील अंतरिम स्थगिती कायम ठेवण्याची कंपनीची विनंतीसुद्धा खंडपीठाने अमान्य केली. परिणामी कंपनीला ३२८ कोटी रुपये दंड भरावाच लागणार आहे.
(हेही वाचा : आता शिवसेना नेते आनंदराव अडसुळांचाही मुलगा, जावई गोत्यात!)
काय आहे प्रकरण?
जालना-औरंगाबाद दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी मेसर्स मॉन्टे कार्लो कंपनी लिमिटेड यांना कंत्राट देण्यात आले आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी उत्खननासाठी परवानगी दिली होती. परंतु, मॉन्टे कार्लो कंपनीने अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन, वापर, वाहतूक व साठवणूक केल्याचे आढळले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडाला अशी तक्रार बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने उत्खनन केलेल्या स्थळांची पाहणी केली असता कंपनीने परवानगी नसलेल्या जालना व बदनापूर तालुक्यांच्या हद्दीतील गटामधून अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन करून वापर व साठवणूक केल्याचे आढळले होते.
Join Our WhatsApp Community