शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावे लागणार आहे. राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर, त्यांना सोमवारी ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली. राऊत यांच्या अटकेनंतरही ईडीने मुंबईतील अनेक ठिकाणी धाडसत्र केले. गोरेगाव येथेही राऊत यांच्या संबंधितांवर ईडीने धाड मारली होती. त्यात ईडीला काही महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच राऊत यांच्याविरोधात भक्कम पुरावे तयार झाल्याने, राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.
( हेही वाचा: OBC आरक्षणाची सुनावणी पाच आठवड्यांनी लांबणीवर; विशेष खंडपीठ गठीत करणार )
राऊतांनी कोणतीही तक्रार केली नाही
सोमवारी राऊत यांनी न्यायालयात कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. मागच्या वेळी राऊत यांनी न्यायालयातील गैरसोयींची तक्रार केली होती. त्यांना कोंदट रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे राऊत म्हणाले होते. त्यावर न्यायालयानेही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत यांना एसी रुममध्ये ठेवल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला होता. संजय राऊत यांना घरचे जेवण देण्यास परवानगी आहे, तसेच त्यांना कोठडीत एक वहीदेखील देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community