रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या खात्याशी संलग्न असलेल्या मनरेगा अंतर्गत २६ हजार २५० टॅब खरेदीच्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, दानवे यांना यासंबंधीची माहिती शिवसेनेतील एका आमदाराने पुरावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे हा आमदार मराठवाड्यातील असून, मंत्रिपदासाठी इच्छुक आहे. मात्र, विद्यमान मंत्रिमंडळात मराठवाड्यातील मंत्र्यांची संख्या सर्वाधिक झाल्याने त्याला संधी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शिवसेनेच्या तीन मंत्र्यांपैकी एकाची विकेट काढण्यासाठी त्याच्याकडून खटाटोप सुरू असल्याचे कळते. याआधी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी असाच प्रकार घडल्यानंतर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता भुमरे यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
(हेही वाचा – शेती महामंडळाच्या ४७ हेक्टर जागेचा आता ‘जनहितार्थ’ वापर होणार)
दानवेंचे आरोप काय?
रोहयो विभागाचे सचिव नंद कुमार हे बुधवारी सेवानिवृत्त होत असताना त्यांनी २६ हजार २५० टॅब खरेदीसाठी ७० कोटी रुपयांची खरेदी निविदा काढली आहे. त्या टॅबमध्ये जीआयएस मोबाईल अॅप्लिकेशनचा समावेश असावा, अशी अट घालण्यात आली आहे. वास्तविक केंद्र सरकारने हे मोबाईल अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिलेले असताना यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.
१ डिसेंबर २०१६च्या शासन निर्णयानुसार ५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही, सचिवांना १ ते ५ कोटी मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना ७० कोटींची निविदा काढण्यात आली त्याचे कारण काय, असे सवाल दानवे यांनी उपस्थित केले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community