सांगलीचा ‘असा’ होणार चौफेर विकास, गडकरींनी व्यक्त केला विश्वास!

118

सांगली जिल्ह्याची द्राक्षे, उद्योगातून तयार होणार माल, हळद, साखर थेट परदेशात निर्यात होऊ लागल्यास सांगलीची आर्थिक स्थिती बदलेल व सांगली हा महाराष्ट्रातील समृध्द व संपन्न जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये पाण्याची, रस्त्यांची, ऊर्जेची सोय झाली. आता ड्रायपोर्ट सॅटेलाईट पोर्टही येणार आहे. त्या ठिकाणी एअरपोर्टही येईल, त्यामुळे सांगलीचा चौफेर विकास होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला..

महाराष्ट्रात पाच लाख कोटींची कामे 

राजमती मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे 2 हजार 334 कोटी किंमतीच्या 96.78 कि. मी. लांबीच्या दोन महामार्ग प्रकल्पांचे डिजीटल पध्दतीने लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुणे ते बेंगलोर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून याची लांबी 699 कि. मी. आहे. हा पूर्ण ग्रीन हायवे असून याचा प्रस्ताव पूर्ण झालेला आहे. हा महामार्ग पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील दुष्काळी भागातून जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे या दुष्काळी भागाचाही कायापालट होईल. यासाठी जवळपास 40 हजार कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर सांगलीसाठी आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे तो म्हणजे सिन्नर, अहमदनगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, चिकोडी. हा महामार्गही तयार करण्यात येईल. यालाही 160 राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा पेठ ते सांगली या महामार्गाचे काम येत्या तीन ते चार महिन्यात सुरू होईल. त्याबाबतचे टेंडर तातडीने निघेल. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सात वर्षात जी रस्त्यांची लांबी होती ती जवळपास साडेतीन पटीने वाढली आहे. तशीच ती महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी आत्तापर्यंत 5 लाख कोटी रूपयांची कामे महाराष्ट्रात करण्यात आली आहेत.

( हेही वाचा: आनंदाची बातमी! कोकणातील पर्यटनाला मिळणार चालना )

असा होईल सांगलीचा विकास

सांगलीमध्ये प्रामुख्याने तयार होणारी साखर, हळद, द्राक्ष तसेच बेदाणे थेट पदरेशात पाठवण्यासाठी सांगली येथे सॅटेलाईट ड्रायपोर्ट उभा करण्यात येईल, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टच्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल व सील झालेले कंटेनर्स थेट परदेशी बाजारपेठेत पाठवण्यात येतील. असा सुविधायुक्त लॉजिस्टीक पार्क, सॅटेलाईट ड्रायपोर्ट तयार होईल. यासाठी आवश्यक असणारी जमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी. या उभारणीसाठी देशात 2 लाख कोटी इतकी तरतूद आहे. आत्तापर्यंत जालना, वर्धा, नाशिक या ठिकाणी ड्रायपोर्ट तयार झाले आहेत. आता सांगलीचाही ड्रायपोर्ट लवकर तयार होईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू होईल. यामध्ये केंद्राचा व राज्याचा प्रत्येकी 50 टक्के निधी असेल, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सांगलीमध्ये उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टीक पार्कमध्ये साडेतीन कि.मी. चा सिमेंट क्राँक्रीटचा रोड असा बांधण्यात येईल की ज्यावर कोणतेही मोठे विमान उतरू शकेल. यामुळे सांगलीमध्ये एअरपोर्ट लॉजिस्टीक पार्क, प्रि कुलींग प्लँट, कोल्ड स्टोअरेज थेट आयात निर्यात व्यवस्था जिल्ह्यासाठी निर्माण होईल. त्यामुळे सांगलीचा आर्थिक विकास होईल. यासाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.