संजय निरुपम यांचे शिवसेनेवर शरसंधान… म्हणाले ही सत्ता प्रायोजित हप्ता वसुली!

सरकारमध्ये हा विरोधाभास निर्माण झाला आहे, या विरोधाभासाने सरकारची प्रतिमा अजून खराब होईल, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घडामोडी या वेगाने बदलताना दिसत आहेत. सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांतून अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने कठोर पावले उचलली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन सरकारने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करत पोलिस दलात मोठे फेरबदल केले. पण असे असतानासुद्धा शिवसेनेकडून मात्र परमबीर सिंग यांचे कौतुक होत आहे. यावरुनच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर ट्विटरवरुन शरसंधान साधले आहे.

काय आहे निरुपमांचे ट्वीट?

सध्या राज्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेच्या खुर्चीवर असताना, काँग्रेस नेते संजय निरुपम हे मात्र कायमच शिवसेनेवर टीका करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यावरुनच संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना परमबीर सिंग यांचा जयजयकार करत आहे. पण काल राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र तत्कालीन आयुक्तांकडून चूका झाल्या असे म्हटले. त्यामुळे सरकारमध्ये हा विरोधाभास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे. तसेच या विरोधाभासाने सरकारची प्रतिमा अजून खराब होईल, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. आतापर्यंत वाझे प्रकरण हे एक सत्ता प्रायोजित हप्ता वसुली कांड असल्याचे चित्र दिसत आहे. याची नाळ शिवसेनेशी तर जोडली गेली नाही ना, असा खळबळजनक प्रश्न विचारत त्यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले आहेत.

(हेही वाचाः ठाकरे सरकारने पोलिस दलात बदल्यांचा बाजार मांडला – प्रविण दरेकर!)

सामनामधून परमबीर सिंग यांचे कौतुक

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके,मनसुख हिरेन आणि त्यानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याभोवती फिरणारे संशयाचे वारे या सगळ्यामुळे आरोपांची एक वावटळच गेले काही दिवस राज्यात उठली. हे सगळे प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे अपयशी ठरत असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पण तरीही शिवसेनेकडून मात्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरुन बदली झाली म्हणजे ते काही गुन्हेगार ठरत नाहीत, त्यांनी अत्यंत कठीण काळात आयुक्तपदाची सूत्रे हातात घेत, कोरोना संकटाशी लढण्यासाठी पोलिसांमध्ये जोश निर्माण केला, असे म्हणत सामनामधून सिंग यांची स्तुती केली आहे. इतकेच नाही तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात त्यांनी धैर्याने काम करत सीबीआय पेक्षाही चांगल्या प्रकारे या प्रकरणाचा तपास केला. टीआरपी घोटाळ्याची फाईल सुद्धा त्यांच्याच काळात उघडण्यात आली, त्यामुळेच परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग आहे, असे म्हणत सामनामधून परमबीर सिंग यांची पाठराखण करण्यात आली आहे. पण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र एका मुलाखतीत परमबीर सिंग यांच्याकडून अक्षम्य चूका झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या विरोधाभासावर संजय निरुपम यांनी टीका केली.

(हेही वाचाः परमबीर सिंग यांच्याकडून अक्षम्य चूक! – अनिल देशमुख )

…म्हणून सिंग यांच्यावर कारवाई- देशमुख

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण असो किंवा मनसुख हिरेन यांचे मृत्यू प्रकरण असो, या दोन्ही प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा आढळून आला, त्यामुळे सिंग यांच्यावर कारवाई झाली, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत काल सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करुनच हा निर्णय घेण्यात आला, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले होते. इतकेच नाही तर मुंबई पेलिस दलाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेल्या हेमंत नगराळे यांनीही पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे, ती नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here