…तर कायदेशीर पावले उचलीन; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह विरोधी पक्षांनी टिपेचा विरोध सुरू केला आहे. राठोड यांनीही यासंदर्भातील मौन अखेर सोडले असून, यापुढे आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

( हेही वाचा : Rupee bank : रिझर्व्ह बॅंकेकडून पुण्यातील रुपी बॅंकेचा परवाना रद्द )

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले, मी भटक्या, विमुक्त आणि मागासवर्ग समाजातून येतो. चारवेळा मोठ्या मताने निवडून आल्यानंतर मला मंत्रीपदाची शपथ मिळाली. मागच्या सरकारमध्येही मी मंत्री होतो. पण एक घटना घडली आणि त्यावरून माझ्यावर गंभीर आरोप झाले. आरोपांची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही भूमिका घेवून मी स्वत: राजीनामा दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन मला क्लीन चीट दिली. पोलिसांनी सर्व बाबी मांडल्या आहेत.

गेले १५ महिने मी आणि माझे कुटुंबीय मानसिक तणावात होतो. अशा प्रसंगामधून खरेतर कुणालाही जावे लागू नये. मी गेल्या ३० वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला, असेही राठोड म्हणाले.

मी निष्कलंक – राठोड

यासंदर्भात पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. मी निष्कलंक आहे. संबंधित प्रकरणात माझा काही हस्तक्षेप होता असे काही समोर आलेले नाही. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्रा वाघ यांना माहिती असेल, आम्ही सर्व कागदपत्रे त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी सर्व तपास केला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे मी आतापर्यंत शांत होतो. आता सर्व सत्य बाहेर आल्याने मी यापुढे शांत बसणार नाही. असेच आरोप होत राहिले तर कायदेशीर पावले उचलीन, कायदेशीर नोटीस पाठवीन, असा इशाराही राठोड यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here