संजय राऊतांनी शरद पवारांना आणले अडचणीत

290

मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या आग्रहामुळे अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यापैकी खासदार नवनीत राणा यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असे राऊत यांनी म्हटले आहे. या आरोपातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अडचणीत येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण ज्या काळात राणा यांचे लकडावाला यांच्याशी आर्थिक व्यवहार झाले, तो २०१९चा कालखंड होता आणि तेव्हा नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने समर्थने दिले होते. त्यामुळे या व्यवहाराशी पवारांचा संबंध आहे का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी थेट पवार आणि लकडावाला यांचा फोटो व्हायरल केल्यामुळे पवार आणखी चर्चेत आले आहेत.

पवारांचा ‘त्या’ व्यवहारात सहभाग? 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. युसुफ लकडावाला याचा काही दिवसांपूर्वीच तुरुंगात मृत्यू झाला. याच लकडावालाला ईडीने पैशांची अफरातफर आणि दाऊद गँगशी संबंध असल्याप्रकरणी अटक केली होती, असे ट्विट राऊतांनी केले आहे. मनी लाँड्रिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. २०१९ मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली लकडावालाला अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली होती. याच २०१९ साली नवनीत राणा यांनी लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या वेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनाने लोकसभा निवडणूक लढत होत्या. त्यामुळे हा व्यवहारात  पवारांचा सहभाग होता का, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.

(हेही वाचा सदावर्ते पुन्हा एसटी कामगारांची मोट बांधणार!)

शरद पवारांचा लकडावालासोबत फोटो  

राऊत यांनी आरोप केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी युसूफ लकडावालासोबतचा शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. कंबोज यांनी युसूफ लकडावाला याचे इतर दिग्गज नेत्यांसमवेतचेही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. मोहित कंबोज यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दोन-तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटो निळा कोट परिधान केलेला युसूफ लकडावाला असून त्याच्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असा दावा कंबोज यांनी केला आहे. तसेच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमेवतचाही युसूफ लकडावाला याचा फोटो कंबोज यांनी शेअर केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. खासदार राऊत या फोटोवर काय म्हणतील? असा सवालही कंबोज यांनी विचारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.