बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत तिच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चांगलीच चर्चेत आली आहे. ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आणि तिच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर संताप व्यक्त करत कंगना राणावतला देखील इशारा दिला आहे. कंगना राणावतच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. कंगनाचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान आहे, असे राऊतांनी म्हटलं आहे. तसेच कंगनाला देण्यात आलेला राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांकडून करण्यात आली आहे.
कंगनाच्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार
‘७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोच सन्मान कंगनाना देण्यात आला हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आले आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल,’असे म्हणत संजय राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राऊत बोलताना असेही म्हणाले की, भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी.
(हेही वाचा- आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाने गृहनिर्माणाऐवजी उभ्या राहणार झोपड्या)
असं म्हणाली कंगना…
भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळल्याचे पाहायला मिळाले. भाजपा नेते वरून गांधी यांनी देखील कंगनावर टीका केली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान होतो, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर होतो, आतातर शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार होत आहे. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?, अशी टीका त्यांनी केली आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021