एकीकडे मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते गणेश विसर्जन मिरवणुकांनी गजबजून गेले असताना, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संजय राऊतांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला बोलावले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले, तरी राऊतांना जामीन न मिळण्यामागील तांत्रिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचे कळते.
( हेही वाचा : चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनला अटलबिहारी वाजपेयींचे नाव, २५ डिसेंबरला होणार लोकार्पण)
पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. जामीन न मिळाल्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. या सर्व घडामोडींत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना अचानक मातोश्रीवर बोलावून घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राऊतांना जामीन मिळेल!
उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख असले, तरी ते आता राऊत कुटुंबाचेही प्रमुख आहेत. त्यामुळेच त्यांनी मला बोलावले आणि आमच्या कुटुंबाची विचारपूस केली. संजय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला असून मला खात्री आहे की, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने लवकरच त्यांना जामीन मिळेल,असा विश्वासही सुनील यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंमुळेच कोरोना आटोक्यात – राऊत
सध्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे असले, तरी प्रत्यक्षात सरकार देवेंद्र फडणवीसच चालवत आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री मजबूत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केले, ते जगातले कुठलेही मुख्यमंत्री करू शकले नाहीत. ठाकरेंच्या प्रयत्नामुळेच कोरोना अटोक्यात आल्याचा दावाही सुनील राऊत यांनी केला.
गद्दार ते गद्दराच!
दसरा मेळाव्याबाबत बोलताना सुनील राऊत म्हणाले की,दसरा मेळावा हा शिवसेनेचाच, हा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.पुढे ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे.कोणी कितीही दावा केला, तरी ओरिजनल ते ओरिजनल; अन् गद्दार ते गद्दराच राहणार,अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली.
Join Our WhatsApp Community